अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण; शौर्य, त्याग आणि सामाजिक कार्याला उजाळा
मंडणगड (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारक, कुस्तीगीर आणि समाजसुधारक आद्य क्रांतिगुरू लहुजी राघोजी साळवे यांची जयंती मंडणगड तालुक्यातील भिंगळोली येथे १४ नोव्हेंबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा महामंत्री अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने त्यांच्या शौर्य, त्याग, देशभक्ती आणि सामाजिक योगदानाचे स्मरण करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना अभिजीत देवळेकर म्हणाले की, आद्य क्रांतिगुरू लहुजी राघोजी साळवे हे केवळ कुस्ती आणि युद्धकलेचे प्रशिक्षक नव्हते, तर स्वातंत्र्य, समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाचे प्रेरणास्थान होते. ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढण्याची जिद्द आणि राष्ट्रभक्तीची भावना त्यांनी समाजामध्ये रुजवली. अनेक क्रांतिकारकांना शारीरिक प्रशिक्षण आणि युद्धकलेचे धडे देऊन स्वातंत्र्यलढ्याला बळ देण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले.
समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांमध्ये आत्मविश्वास व स्वाभिमान जागृत करण्यासाठी लहुजी साळवे यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचे संपूर्ण जीवन संघर्ष, त्याग, शौर्य आणि देशभक्तीचा आदर्श आहे. त्यांच्या कार्यातून आजही नव्या पिढीला प्रेरणा मिळते, असे देवळेकर यांनी नमूद केले.
पुढे बोलताना त्यांनी तरुण पिढीला आवाहन केले की, लहुजी साळवे यांचे विचार केवळ जयंतीपुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. अन्यायाविरुद्ध निर्भयपणे आवाज उठवणे, शिक्षणाला प्राधान्य देणे तसेच समाजात बंधुभाव, समानता आणि एकता निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमाला भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा महामंत्री अभिजीत देवळेकर, अनुसूचित जाती मोर्चाचे मंडणगड तालुकाध्यक्ष संतोष दाभिळकर, सचिन दाभिळकर, चेतन दाभिळकर, दीपेश दाभिळकर, योगेंद्र देवळेकर, धनंजय देवळेकर, द्रौपदी दाभिळकर, विद्या दाभिळकर, पूनम देवळेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.













