तीन महिन्यात १२ अपघात, चार जणांचा मृत्यू, ३५ जण जखमी, लाखोंची हानी
संतोष कोत्रे
लांजा : मुंबई गोवा महामार्गावर लांजा तालुक्याच्या हद्दीत आंजणारी घाट आणि तेथील तीव्र उतार हा वाहन चालकांसाठी आणि विशेषता अवजड वाहनांसाठी सर्वाधिक डेंजरस ठिकाण बनले आहे. जणू मृत्यूचा सापळाच. गेल्या तीन महिन्यात झालेल्या विविध १०- १२ अपघातांमध्ये चार जणांना आपले प्राण गमवावे लागले असून ३५ जण जखमी झालेले आहेत. याशिवाय वाहनांचे आणि त्यातील सामानाचे झालेले नुकसान हे काही लाख रुपयांच्या घरात आहे.
म्हणजेच चौपदरी करण्याच्या कामानंतर आंजणारी घाट व त्या ठिकाणचा तीव्र स्वरूपाचा उतार हा वाहनांच्या अपघातास कारणीभूत ठरत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याला जबाबदार कोण? राष्ट्रीय महामार्ग विभाग की संबंधित ठेकेदार कंपनी? याबाबत मतप्रवाह वेगवेगळे असले तरीही
महामार्गाचे काम करताना ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली नव्हती का? आता पुन्हा नव्याने सर्वे करून आंजणारी येथील काजळी नदीवर पुन्हा नवा पूल उभारून नवीन मार्ग तयार करायचा. त्यासाठी करोडो रुपयांचा निधी खर्च करायचा. जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी नाही का? राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणच्या कामाचा सर्वे करताना ही बाब त्यांच्या लक्षात आली नाही का? सर्वे करणाऱ्यांनी ऑफिस मध्ये (कार्यालयात) बसून सर्वे केला का?
असा संतप्त सवाल आता सुज्ञ नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
आंजणारी घाट हा अवजड वाहनांच्या अपघातासाठी जणू कु प्रसिद्ध झाला आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामध्ये वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातन कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना न केल्याने या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. चौपदरीकरणांमध्ये मुंबई गोवा महामार्ग सुसाट बनल्याने वाहन चालक आपली वाहने पळवत असतात. मात्र ट्रक, कंटेनर व अन्य अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांचे उताराच्या ठिकाणी ब्रेक लागत नसल्याने किंवा निकामी होऊन अपघात होत आहेत. तीव्र उतारामुळे वाहन चालकांना वाहनाच्या गतीवर ब्रेक लावणे अवघड होते आणि त्यानंतर ही वाहने महामार्गावर पलटी होतात किंवा महामार्गा लगतच्या डोंगरावर जाऊन आदळतात. काही वेळेला रॉंग साईडला जाऊन अन्य वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत ठरत आहेत.
या ठिकाणी वाहनांची गती कमी करण्यासाठी सुरुवातीला बॅरल उभे करण्यात आले होते. मात्र ही व्यवस्था तुटपुंजी ठरली. त्यानंतर या ठिकाणी पांढऱ्या रंगाचे गतिरोधक(रंबलर) बसवण्यात आले. मात्र या गतिरोधकावरून गाडी थांबण्या ऐवजी घसरत असून अपघात होतच आहेत. त्यामुळे हा देखील उपाय कुचकामी ठरला आहे. या ठिकाणी अपघात रोखण्यासाठी भोस्ते घाटाप्रमाणे आंजणारी घाटामध्ये गतिरोधक बसवण्याबरोबरच दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर, प्रकाशयोजना, संरक्षक कठडे आणि क्रॅश बॅरिअर्स आदी उपाययोजना तातडीने करण्याची गरज आहे. गतिरोधक बसवताना ते वरील भागापासून म्हणजे अजून आली घाटातील उतार जिथून सुरू होतो त्या मठ मल्लिनाथ मंदिरा पासून आंजणारी पुलापर्यंतच्या साधारणपणे दोन किमीच्या अंतरात १० ते १५ गतिरोधक बसवणे आवश्यक आहे. जेणेकरून अवजड वाहने ही वरील भागातूनच हळू येतील त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल.
चौपदरीकरण अगोदर आंजणारी घाटात अपघाताचे प्रमाण कमी होते. परंतु महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामानंतर आंजणारी घाट आणि पूल या ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण वाढीस लागले असल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनांतून दिसून येत आहे. अपघातांची ही मालिका सुरूच असल्याने संबंधित प्रशासन देखील हतबल झाले असल्याचे दिसते. अपघात थांबवायचे कसे? असा मोठा प्रश्न सध्या राष्ट्रीय महामार्ग विभागासमोर आहे. असे असले तरी अपघात झाल्यानंतर केवळ वाहनचालकांची चूक किंवा निष्काळजीपणा म्हणून प्रशासनाला आपली जबाबदारी झटकता येणार नाही. अंजणारी घाटातील तीव्र वळणे, उतार, अवजड वाहनांची वाहतूक, रस्त्याची भौमितिक रचना, दिशादर्शक फलक, संरक्षक कठडे आणि अपघात प्रतिबंधक उपाययोजना यांचीही तितक्याच गांभीर्याने तपासणी होणे आवश्यक आहे.
आता अपघाताची मालिका थांबत नसल्याने जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून अपघात टाळण्यासाठी आंजणारी घाटाच्या वरच्या बाजूने तब्बल २१ कोटी रुपये खर्च करून १०० मीटर उंचीचा! उड्डाणपूल उभारण्या बाबतचा सुधारित प्रस्ताव तातडीने मुंबईकडे मंजूरसाठी पाठवण्यात आला आहे. असे असले तरी हे उशिरा सुचलेले शहाणपण म्हणता येणार आहे. आणि उड्डाणपूल होईपर्यंत अजून या ठिकाणी असंख्य अपघात होऊन अनेक जण जखमी होतील हे अपघाताच्या मालिकेवरून म्हणता येईल.
तेीन महिन्यात झालेले अपघात
दि. ३ जुलै- महामार्गावर उभ्या असलेल्या ४०७ टेम्पोला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर महामार्गालगत दरडीवर आपटून पलटी, चालक गंभीर जखमी
दि.१ ऑगस्ट – मालवाहू ट्रकला अपघात ट्रक जळून भस्मसात दोघे जखमी
दि.४ सप्टेंबर- रोजी रात्री २०.४५ वाजता स्लाइडिंगचे साहित्य घेऊन जाणारा ट्रक पलटी, जखमी चालकाचा मृत्यू
दि.२ ऑक्टोबर – कोळसा घेऊन जाणारा ट्रक पलटी चालक गंभीर जखमी
दि.८ ऑक्टोबर – दोन कंटेनरमध्ये धडक चालक जखमी
दि.२१ ऑक्टोबर- मच्छी वाहतूक करणारा ट्रक अंजनारी पूल येथे पलटी चालक जखमी मच्छीचे नुकसान
दि.२२ ऑक्टोबर -मच्छीची वाहतूक करणारा कंटेनर पलटी चालक जखमी
दि. ३१ ऑक्टोबर – भरधाव कंटेनर ची पोलीस व्हॅनला धडक, एका पोलीस कर्मचाऱ्यासह ट्रक चालक व क्लीनर असा तिघांचा मृत्यू, एक पोलीस गंभीर
दि. १३ नोव्हेंबर – भरधाव ट्रकची लक्झरी बसला धडक, २६ जण जखमी












