रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार किरण सामंत १७ नाोव्हेेंबर रोजी रेल्वे स्थानकांची करणार पाहणी

लांजा-राजापूर तालुक्यातील सात रेल्वे स्थानकांना देणार प्रत्यक्ष भेट; प्रवाशांच्या अडचणी जाणून घेऊन रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करणार

राजापूर प्रतिनिधी : लांजा आणि राजापूर तालुक्यातील रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी तसेच रेल्वे स्थानकांवरील सोयी-सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत हे मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी रेल्वे स्थानकांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांच्या समस्या, अपुऱ्या सुविधा आणि स्थानिकांच्या प्रलंबित मागण्या जाणून ते जाणून घेणार आहेत
कोकण रेल्वे मार्गावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र, अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. रेल्वे गाड्यांना थांबा मिळणे, स्थानकांवरील मूलभूत सुविधा, प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक व्यवस्था, स्थानक परिसरातील प्रश्न अशा विविध विषयांबाबत स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून सातत्याने मागण्या केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार किरण सामंत यांनी स्वतः रेल्वे स्थानकांना भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे.या दौऱ्यात लांजा आणि राजापूर तालुक्यातील एकूण सात रेल्वे स्थानकांना भेट देण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता निवसर (ता. लांजा) येथून दौऱ्याची सुरुवात होईल. त्यानंतर दुपारी १२ वाजता अंजणारी, दुपारी १ वाजता आडवली, दुपारी २ वाजता वेरवली आणि दुपारी ३.३० वाजता विलवडे रेल्वे स्थानकाला भेट देण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४.३० वाजता सौंदळ (ता. राजापूर) आणि सायंकाळी ५.३० वाजता राजापूर रोड रेल्वे स्थानकाला भेट देऊन दौऱ्याची सांगता होणार आहे.
या दौऱ्यादरम्यान आमदार किरण सामंत हे प्रत्येक रेल्वे स्थानकावर प्रत्यक्ष भेट देऊन तेथील सुविधा, प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि स्थानिक नागरिकांच्या मागण्या जाणून घेणार आहेत. रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्रश्नांची माहिती घेऊन संबंधित रेल्वे प्रशासनाकडे त्याबाबत पाठपुरावा करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.
प्रवाशांनी समस्या मांडण्याचे आवाहन
रेल्वे प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. स्थानिक नागरिक, नियमित रेल्वे प्रवासी तसेच प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी संबंधित रेल्वे स्थानकांवर उपस्थित राहून आपल्या समस्या आणि प्रलंबित मागण्या आमदार किरण सामंत यांच्यासमोर मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
रेल्वे प्रवाशांच्या अडचणी केवळ कागदोपत्री न राहता त्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आता या दौऱ्यात प्रवाशांचे कोणते प्रश्न पुढे येतात आणि त्यावर रेल्वे प्रशासनाकडून कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याकडे लांजा व राजापूर तालुक्यातील रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.