अभिजीत देवळेकर व हरिश्चंद्र हिलम यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण; आदिवासी बांधवांकडून अभिवादन
मंडणगड (प्रतिनिधी) : आदिवासी समाजाच्या स्वाभिमानाचे प्रतीक, महान स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मंडणगड तालुक्यातील घोसाळे आदिवासीवाडी येथे आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस भाजपा अनुसूचित जाती मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हा महामंत्री अभिजीत देवळेकर व ज्येष्ठ मार्गदर्शक हरिश्चंद्र हिलम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना अभिजीत देवळेकर म्हणाले की, भगवान बिरसा मुंडा हे केवळ महान क्रांतिकारक नव्हते, तर अन्याय, अत्याचार आणि शोषणाविरुद्ध लढा देणारे आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आदिवासी समाजामध्ये स्वाभिमान, एकता, सामाजिक जागृती आणि आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची जिद्द निर्माण केली.
ब्रिटिशांच्या अन्यायकारक राजवटीविरोधात त्यांनी दिलेला लढा भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पर्व ठरला आहे. जल, जंगल आणि जमीन या आदिवासी समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी त्यांनी केलेला संघर्ष आजही सामाजिक न्याय, समानता आणि स्वाभिमानाची प्रेरणा देत आहे.
भगवान बिरसा मुंडा यांचे जीवन आपल्याला समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी निर्भयपणे उभे राहण्याचा संदेश देते. त्यांचे विचार, त्याग आणि संघर्ष नव्या पिढीसाठी सदैव प्रेरणादायी राहतील. महापुरुषांचे विचार केवळ जयंतीपुरते मर्यादित न ठेवता ते आपल्या आचरणात आणणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असेही देवळेकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला भाजपा अनुसूचित जाती मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हा महामंत्री अभिजीत देवळेकर, ज्येष्ठ मार्गदर्शक हरिश्चंद्र हिलम, राजेश जाधव, भिकू जाधव, राजाराम जाधव, अजय कोळी, वनिता हिलम, कमल जाधव, सुनीता कोळी, जयश्री जाधव, गंगू हिलम तसेच आशासेविका रिया जाधव यांच्यासह घोसाळे आदिवासीवाडीतील मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.












