निनावे येथे रस्ते कामासाठी ठेवलेला चार लाखांचा लोखंडी ब्रेकर अज्ञात चोरट्याने केला लंपास

देवरूख (प्रतिनिधी):

संगमेश्वर तालुक्यातील निनावे गावाच्या एस.टी. बस पिकअप शेडजवळून रस्ते कामासाठी ठेवण्यात आलेला ४ लाख रुपये किमतीचा दगड फोडण्याचा जुना वापरता लोखंडी ब्रेकर अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजून १६ मिनिटांनी देवरूख पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कायदा कलम ३०३(२) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक १७४/२०२६ नुसार नोंद करण्यात आला आहे.

या घटनेची फिर्याद शिरूर (ता. शिरूर, जि. पुणे) येथील सुरजनगर येथे राहणारे कंत्राटदार व डेव्हलपर्स दादाभाऊ रामदास वाकरे (वय ५६) यांनी दिली आहे. फिर्यादी वाकरे हे पाली (ता. जि. रत्नागिरी) येथील श्री आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शन लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाट येथील कळकदरा ते मार्लेश्वर (ता. संगमेश्वर) दरम्यानच्या सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम करत आहेत. या कामासाठी ते संबंधित कंपनीकडून पोकलँड मशीन व रोड रोलरच्या साहाय्याने खोदकाम व रस्ता लेव्हल करण्याची कामे पार पाडत होते. दरम्यान, १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजण्यापूर्वीच्या सुमारास (नेमकी वेळ समजून येत नाही) निनावे गावाच्या एस.टी. बस पिकअप शेडजवळ ठेवलेला इनव्हॉइस क्रमांक पी.एम.टी./२२-२३/१०७९१ असलेला ४,००,००० रुपये किमतीचा लोखंडी ब्रेकर कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने स्वतःच्या फायद्यासाठी चोरून नेला. चोरीचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी दादाभाऊ वाकरे यांनी देवरूख पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून देवरूख पोलीस या चोरीचा पुढील तपास करत आहेत.