भाविकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार? स्थानिक ग्रामस्थांचा संतप्त सवाल
निलेश जाधव / देवरूख:
राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे सहा वर्षीय चिमुकलीचा डोंगरावरून दगड पडून झालेल्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेनंतर भाविकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची, असा संतप्त सवाल स्थानिक ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
सांगली येथून कुटुंबासमवेत मार्लेश्वर दर्शनासाठी आलेल्या सहा वर्षीय ऋत्वी पाटील या चिमुकलीचा डोंगरावरून पडलेल्या दगडामुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता. देवदर्शनासाठी आलेल्या पाटील कुटुंबावर काळाने घाला घातल्याने आनंदाचे वातावरण क्षणात दुःखात परिवर्तित झाले. या घटनेने केवळ पाटील कुटुंबावरच नव्हे, तर संपूर्ण मार्लेश्वर परिसरावर शोककळा पसरली आहे. मार्लेश्वर हे निसर्गरम्य सह्याद्रीच्या कुशीत वसलेले प्रसिद्ध धार्मिक पर्यटनस्थळ आहे. दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. विशेषतः सण, उत्सव, सुट्ट्या आणि धार्मिक कार्यक्रमांच्या काळात भाविकांची मोठी गर्दी होत असते.
मार्लेश्वर देवस्थान परिसरातील दत्तमंदिराकडे जाण्यासाठी सध्या फुटब्रिजचे काम सुरू आहे. या कामासाठी ठेकेदाराकडून सुरूंग स्फोट करण्यात येत असल्याच्या चर्चेमुळे परिसरातील डोंगर सुरक्षिततेबाबतही स्थानिक ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. अशा कामांमुळे डोंगरावरील दगड सैल होण्याची शक्यता आणि भाविकांच्या जीविताला निर्माण होणारा धोका याबाबत योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा सवाल करण्यात येत आहे. मार्लेश्वर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांमध्ये प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त होत आहे. भाविकांची मोठी वर्दळ असलेल्या तीर्थक्षेत्री संभाव्य धोके ओळखून आधीच सुरक्षा उपाययोजना करणे आवश्यक होते. मात्र, एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच सुरक्षेच्या उपाययोजनांचा विचार केला जाणार का? असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
डोंगरावरून दगड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, धोकादायक भागात भाविकांना प्रवेशबंदी करणे, सूचना फलक लावणे, सुरक्षित मार्ग निश्चित करणे आणि आवश्यकतेनुसार सुरक्षारक्षकांची नियुक्ती करणे या उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज आहे. मार्लेश्वर देवस्थान परिसरात एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार? देवस्थान व्यवस्थापन, संबंधित ठेकेदार, बांधकाम विभाग की प्रशासन? असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.भाविकांच्या सुरक्षेसाठी संबंधित सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे. विकासकामे करताना भाविकांच्या जीविताला धोका निर्माण होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच, सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन होत आहे की नाही, याची तपासणी संबंधित अधिकाऱ्यांनी करावी, अशी मागणीही होत आहे.
मार्लेश्वर तीर्थक्षेत्रात भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना घडू नये, यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी काही महत्त्वाच्या मागण्या पुढे केल्या आहेत. त्यामध्ये डोंगरावरील धोकादायक भागांची तातडीने पाहणी करणे, दगड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविणे, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे, सुरू असलेल्या बांधकामांची सुरक्षा तपासणी करणे आणि दुर्घटनेची सखोल चौकशी करणे यांचा समावेश आहे. तसेच, भाविकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी. देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी संबंधित प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मार्लेश्वर येथे घडलेली ऋत्वी पाटील या सहा वर्षीय चिमुकलीच्या मृत्यूची घटना अत्यंत वेदनादायी आहे. एका निष्पाप बालिकेचा जीव गेल्यानंतरही जर भाविकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना केल्या गेल्या नाहीत, तर भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होण्याची भीती नाकारता येत नाही. मार्लेश्वर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा जीव महत्त्वाचा आहे. निष्पाप चिमुकलीचा मृत्यू झाल्यानंतर तरी प्रशासनाने जागे होऊन ठोस उपाययोजना कराव्यात,” असा संतप्त सवाल स्थानिक ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. आता या गंभीर घटनेनंतर संबंधित प्रशासन, देवस्थान व्यवस्थापन आणि बांधकाम यंत्रणा कोणती भूमिका घेणार, भाविकांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना करणार आणि दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करणार का? याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.













