नियोजित वेळ संपली, तरी कणकवली अंधारातच!

महापारेषणच्या तांत्रिक कामाचा नागरिकांना फटका!

व्यापारी संघटना व कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्या धडकेनंतर वीज पुरवठा सुरळीत !

कणकवली : महावितरणकडून महापारेषणच्या तांत्रिक कामासाठी सोमवारी १६ नोव्हेंबर रोजी कणकवली शहरासह परिसरातील गावांचा वीजपुरवठा सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० या कालावधीत बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, नियोजित वेळ संपूनही रात्री ९ वाजेपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत न झाल्याने नागरिकांना तब्बल १२ तास अंधारात राहावे लागले. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

अखेर व्यापारी संघाचे दीपक बेलवलकर, राजन पारकर, विलास कोरगावकर, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, ऋत्विक नलावडे, नवू झेमने, योगेश मांजरेकर, अनुप वारंग यांनी महावितरणच्या सबस्टेशनवर धडक देत सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलसी बंदोबस्त देखील तैनात ठेवण्यात आला होता.

महापारेषणच्या १३२/३३ केव्ही कणकवली अतिउच्चदाब उपकेंद्राच्या वार्षिक देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी उपकेंद्रातून बाहेर पडणाऱ्या सर्व ३३ केव्ही उच्चदाब वीजवाहिन्या सोमवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० या कालावधीत पूर्णतः बंद ठेवण्यात येणार असल्याचे महावितरण कणकवलीकडून निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले होते. परिणामी, कणकवली शहर व परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या ३३/११ केव्ही कणकवली उपकेंद्राचाही वीजपुरवठा या कालावधीत बंद राहणार असल्याची माहिती ग्राहकांना देण्यात आली होती. मात्र, सायंकाळी ५.३० वाजता वीजपुरवठा सुरू होणे अपेक्षित असताना रात्री ९ वाजेपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत झाला नव्हता. त्यानंतरही बराच वेळ वीज नसल्याने नागरिकांची गैरसोय वाढली. रात्री ९ वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरू न झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दिवसभर वीजपुरवठा बंद असल्याने व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार तसेच घरगुती वीजग्राहकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

दरम्यान, नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन व्यापारी संघाचे दीपक बेलवलकर यांच्यासह व्यापारी संघाचे पदाधिकारी व कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी महावितरणच्या सबस्टेशनवर जाऊन सुरू असलेल्या कामाची माहिती घेतली आणि वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याची मागणी केली. त्यानंतर संबंधित प्रशासनाने दखल घेत वीजपुरवठा सुरळीत सुरू केला. नियोजित वेळेपेक्षा साडेतीन तासांहून अधिक काळ वीजपुरवठा बंद राहिल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत असून, भविष्यात अशा देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी दिलेल्या वेळेचे काटेकोर पालन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

एकीकडे महावितरण आणि दुसरीकडे महापारेषण विभागाकडून तांत्रिक देखभाल व दुरुस्तीच्या कामाबाबत निवेदन प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानुसार सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात नियोजित वेळेपेक्षा तब्बल साडेतीन तास उशिराने म्हणजेच रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. यापेक्षाही दुर्दैवाची बाब म्हणजे नागरिक अंधारात असताना संबंधित विभागातील अधिकाऱ्यांचे फोन स्विच ऑफ असल्याचे आढळून आले. वीजपुरवठा नेमका कधी सुरू होणार, याची माहिती घेण्यासाठी नागरिकांनी नाइलाजाने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अधिकाऱ्यांचे मोबाईल फोन स्विच ऑफ होते, तर काही अधिकारी फोन उचलत नसल्याचा अनुभव नागरिकांना आला. त्यामुळे वीजपुरवठा बंद असताना किमान नागरिकांना योग्य माहिती देण्याची जबाबदारीही संबंधित अधिकाऱ्यांनी पार पाडली नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.