रत्नागिरी: दीपावलीच्या प्रकाशोत्सवात छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणारी एक भव्य प्रतिकृती सध्या रत्नागिरीकरांचे लक्ष वेधून घेत आहे. साळवी स्टॉप येथील छत्रपती नगरमध्ये ‘श्री शिवशंभु मित्र मंडळा’च्या ३० हून अधिक तरुणांनी सलग १५ दिवस अहोरात्र मेहनत घेऊन ३० फूट लांब, १५ फूट रुंद आणि ४ फूट उंच असा हुबेहूब ‘श्री लोहगड’ किल्ला साकारला आहे. गेल्या २२ वर्षांपासून किल्ले बनवण्याची परंपरा जपणाऱ्या या मंडळाचा हा उपक्रम यंदा शिवप्रेमींसाठी विशेष पर्वणी ठरला आहे.
या प्रतिकृतीमध्ये लोहगडाचा ऐतिहासिक स्थापत्यशास्त्राचा वारसा अत्यंत बारकाईने जपला आहे. किल्ल्याचे मुख्य आकर्षण असलेला विंचू कडा, गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महादरवाजा अतिशय सुबकपणे घडवण्यात आले आहेत. यासोबतच सदर, लक्ष्मीकोठी, महादेव मंदिर, अष्टकोणी आणि सोळाकोणी तलाव, पाण्याची टाकी, दर्गा, तुळशी वृंदावन, शिवरायांची मूर्ती, तोफा, ध्वज बुरुज आणि गडावरील वस्ती यांचे दर्शन या प्रतिकृतीतून घडते.
हा ऐतिहासिक ठेवा उभारण्यासाठी मंडळातील शौर्य मांजरेकर, अथर्व शिंदे, आर्यन चव्हाण, रुचिग मुंडे, सुधीर मावडी, आदेश शेलार, तनिष रेडीज, अनिल बावडेकर, सिद्धू भोरे, श्रीयोग चव्हाण, अखिलेश बांबाडे, वैभव पांचाळ, अजय रेडीज, गौरव सावंत, निखिल सावंत, प्रसाद सावंत, अभिजीत गिरकर, अथर्व वरे, नेहा सावंत, ऋषी दुधाने, अंशिका शिंदे,शौर्य खामकर, श्रीयांश विश्वासराव,शिवांगी चव्हाण, आकांक्षा चव्हाण, वेदिका चव्हाण, राजस वने, विनय कदम, श्रेयस झगडे, शुभम मावडी, ऋत्विज पेडणेकर, वेदांत सावंत आणि इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या भव्य किल्ल्याचे उद्घाटन ग्रामीण पोलीस निरीक्षक राजेंद्र पालवे, पत्रकार राजेंद्र चव्हाण, नगरसेवक सौरभ मलुष्ठे, नगरसेविका पूजा पवार, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक दीपक पवार आणि योगेश विरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत दररोज सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत हा किल्ला नागरिकांसाठी खुला राहणार असून, हा ऐतिहासिक वारसा पाहण्यासाठी रत्नागिरीकरांची मोठी गर्दी होत आहे













