आणीबाणी हा भारतीय लोकशाहीवरील काळा अध्याय; खेड येथे भाजपचा संवाद कार्यक्रम संपन्न

खेड (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी, खेड यांच्या वतीने २५ जून १९७५ रोजी लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर “आणीबाणी काळा दिवस” संवाद कार्यक्रमाचे आयोजन आय.सी.एस. कॉलेज, खोंडे-खेड येथे करण्यात आले. भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील आणीबाणीचा काळ, त्याचे परिणाम आणि संविधानिक मूल्यांचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कर्मवीर पद्मश्री दादासाहेब इदाते यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आणीबाणीच्या काळातील घटनांचा आढावा घेतला. त्यांनी २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही मूल्ये आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर झालेल्या परिणामांची माहिती दिली. लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी संविधानिक मूल्यांचे जतन आणि जागरूक नागरिकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाला भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, आय.सी.एस. कॉलेजचे चेअरमन ॲड. आनंदराव भोसले, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम सहीबोले, नगरसेविका वैभवी खेडेकर, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, महाविद्यालयाचे विभाग प्रमुख सचिन भोसले, अनिता आवटी मॅडम, भाजपा महिला मोर्चा खेड शहर उपाध्यक्षा प्रीती चिखले, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार यांच्यासह स्वराज गांधी, ओवेस चौगुले, अनिकेत पवार, प्रसाद मांडवकर, प्रदीप भोसले, डॉ. भालेराव, केलकर सर, सागर सर तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात आणीबाणीच्या काळातील ऐतिहासिक घडामोडींवर चर्चा करण्यात आली तसेच लोकशाही मूल्यांचे संवर्धन आणि संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनीही या विषयावरील विविध प्रश्न विचारत कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.