रत्नागिरी : सेवानिवृत्त डाक कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतनाशी (पेन्शन) संबंधित प्रलंबित तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी रत्नागिरी विभागीय डाक कार्यालयाच्यावतीने शुक्रवार, दि. ४ डिसेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता जिल्हास्तरीय ‘पेन्शन अदालत’ आयोजित करण्यात आली आहे. रत्नागिरी येथील विभागीय डाक कार्यालयात ही अदालत पार पडणार असून, संबंधित निवृत्ती वेतनधारकांनी विहित मुदतीत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन डाकघर अधीक्षक डी. एस. कुलकर्णी यांनी केले आहे.
अर्ज करण्याचे नियम आणि अटी :
पात्र प्रकरणे : निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित ज्या तक्रारींचे ३ महिन्यांच्या आत निराकरण झालेले नाही, केवळ अशाच प्रकरणांचा या पेन्शन अदालतीत विचार केला जाईल.
अपात्र प्रकरणे : नीतिगत प्रकरणे (उदा. उत्तराधिकार इ.) आणि धोरणात्मक विषयांशी संबंधित तक्रारी या अदालतीत विचारात घेतल्या जाणार नाहीत.
तक्रारीचा तपशील : एका व्यक्तीने एकच तक्रार अर्ज करावा. अर्जामध्ये तक्रारीचा संपूर्ण तपशील असावा. यामध्ये मूळ तक्रारीची तारीख आणि ती ज्या अधिकाऱ्याकडे पाठवली होती त्यांचे नाव व हुद्दा नमूद करणे आवश्यक आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता आणि अंतिम मुदत :
संबंधित तक्रारदारांनी आपले अर्ज ‘मा. श्री. डी. एस. कुलकर्णी, डाकघर अधीक्षक, विभागीय कार्यालय, रत्नागिरी – ४१५६१२’ या पत्त्यावर दिनांक ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत किंवा त्यापूर्वी पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
३० नोव्हेंबरनंतर प्राप्त होणाऱ्या कोणत्याही अर्जावर या पेन्शन अदालतीत विचार केला जाणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही डाक प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
Home महत्वाच्या बातम्या जिल्ह्यात ४ डिसेंबरला ‘जिल्हास्तरीय डाक पेन्शन अदालत’; ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन












