देवरूख (प्रतिनिधी):
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटर, देवरुखच्यावतीने शनिवार दि.२१ नोव्हेंबर, २०२६ रोजी दुपारी १:०० ते ४:०० या वेळेत “वसुंधरा ऑलिंपियाड:२०२६” या जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा ४थी ते १२वी या वर्गात शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ४ विविध गटांमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत. वसुंधरा ऑलिंपियाडमध्ये पर्यावरण प्रश्नमंजुषा स्पर्धेसह पर्यावरण पूरक घोषवाक्य व पोस्टर निर्मिती स्पर्धा संपन्न होणार आहे. प्रश्नमंजुषा स्पर्धा बहुपर्यायी प्रश्न(MCQ) स्वरूपात असणार असून, या स्पर्धेसाठी नकारात्मक गुणांकन असणार नाही.
पर्यावरण प्रश्नमंजुषा स्पर्धेचा पेपर मराठी व इंग्रजी दोन्ही माध्यमातून एकत्रित असणार आहे. ‘वसुंधरा ऑलिंपियाड’ स्पर्धेसाठी चार गट असून त्यांची विभागणी स्थर १: इ. ४थी ते ५वी, स्थर २: इ.६वी ते ८वी, स्थर ३: इ. ९वी व १०वी, स्थर ४: इ. ११वी व १२वी अशी करण्यात आली आहे. पर्यावरण प्रश्नमंजुषा स्पर्धेसह पर्यावरण पूरक घोषवाक्य व पोस्टर निर्मिती स्पर्धा यावेळी संपन्न होणार आहे. संपूर्ण स्पर्धांचा निकाल स्पर्धा संपल्यानंतर थोड्या वेळानंतर जाहीर केला जाणार आहे. सदर स्पर्धेसाठी अद्याप नाव नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा सुरू होण्यापूर्वी स्पर्धेच्या ठिकाणी दुपारी १२:०० वाजल्यापासून नाव नोंदणी करता येणार आहे.
या स्पर्धेसाठी सहभागी स्पर्धकांना व शाळांना आकर्षक रोख बक्षीसे, प्रशंसा प्रमाणपत्रे आणि सहभाग प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. सर्व स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थी पदकाने सन्मानित केले जाणार आहे. या स्पर्धेसाठी माफक नोंदणी शुल्क ₹ ५०/- ठेवण्यात आले आहे. शाळांनी सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी ८०८७७०८३८० या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. चंद्रशेखर केदारी यांनी केले आहे.












