पावसाळ्यात पूल पाण्याखाली जात असल्याने म्हाप्रळ, पेवे, पंदेरी गावांचा संपर्क तुटतो
मंडणगड प्रतिनिधी :
म्हाप्रळ पंदेरी मार्गावर लोकरवण येथील महादेव नाला येथील पूल कमी उंचीचा व जीर्ण असल्याने दरवर्षी पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे हा पूल पाण्याखाली जातो. परिणामी म्हाप्रळ, पेवे व पंदेरी या गावांचा बाहेरील भागाशी संपर्क तुटत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पुलाची उंची वाढवून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी म्हाप्रळ येथील सामाजिक कार्यकर्ते बिलाल म्हाळुंकर यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, रत्नागिरीचे मुख्य अभियंता/कार्यकारी अभियंता तसेच रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना ६ ऑक्टोबर रोजी निवेदन सादर केले असुन
निवेदनातील माहीतीनुसार गेल्या अनेक वर्षांपासून म्हाप्रळ-लोकरवण जोडणारा पूल अत्यंत कमी उंचीचा असल्यामुळे अतिवृष्टीच्या काळात पुलावरून पाणी वाहते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प होऊन गावांचा संपर्क तुटतो. पूरस्थितीत गंभीर आजारी रुग्ण, गरोदर महिला तसेच वृद्ध व्यक्तींना रुग्णालयात नेणे कठीण होते. तसेच दूध, भाजीपाला, औषधे आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही बाधित होतो.
पूल बंद राहिल्याने शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी आणि स्थानिक नागरिकांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. पर्यायी मार्ग उपलब्ध असला तरी तो लांबचा असल्याने नागरिकांची गैरसोय वाढते,
या पुलाची उंची वाढविण्याची मागणी स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींकडून यापूर्वीही करण्यात आली आहे. मात्र, अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी असल्याने
तातडीने तांत्रिक सर्वेक्षणाची मागणी
म्हाप्रळ-लोकरवण पुलाचे तातडीने तांत्रिक सर्वेक्षण करून नवीन उंच पूल बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, तसेच आगामी अर्थसंकल्पात या कामासाठी प्राधान्याने निधीची तरतूद करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास भविष्यात तीव्र लोकआंदोलन व कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.













