मार्लेश्वर तीर्थक्षेत्री चिमुकलीच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी; मी तिच्या कुटुंबासोबत- आमदार शेखर निकम

मार्लेश्वर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सुरक्षा महत्त्वाची; तीर्थक्षेत्राचा विकास होत असताना भाविकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होता कामा नये
आमदार शेखर निकम यांनी देवरूख येथील पत्रकार परिषदेत केले स्पष्ट

देवरूख (प्रतिनिधी):

संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मार्लेश्वर येथे डोंगरावरून दगड कोसळून सांगली येथील सहा वर्षीय चिमुकली ऋत्वी पाटील हिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी आहे. देवदर्शनासाठी आनंदाने आलेल्या पाटील कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. या कठीण प्रसंगी मी ऋत्वीच्या कुटुंबासोबत असून, त्यांच्या दुःखात सहभागी आहे, मी ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर सातत्याने माझ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून घटनेबाबत माहिती घेत होतो. याबाबत प्रशासनाशीसुध्दा संपर्कात होतो. मात्र आपली तब्येत ठीक नसल्याने मला तात्काळ घटनास्थळी येता आले नाही. कुटुंबासोबत आनंदाने मार्लेश्वर दर्शनासाठी आलेल्या चिमुकलीचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने आपल्याला अतिव दुःख झाले असल्याचे आमदार शेखर निकम यांनी आज गुरूवारी देवरूख येथील पत्रकार परिषदेत सांगितले.

देवरूख येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी उपसभापती प्रफुल्ल बाईत, पं. स. सदस्य मंगेश बांडागळे, नगरसेवक दिपक खेडेकर, नगरसेवक यशवंत गोपाळ, राष्ट्रवादीचे तालुका संघटक बाळू ढवळे, माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड, देवरूख शहराध्यक्ष हनिफ हरचिरकर, नितीन भोसले, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष प्रतिक साळवी, अनंत जाधव, पंकज पुसाळकर, अरूण किर्वे, विकास राठोड, मोहन हजारे, रामू पंदेरे आदी उपस्थित होते. मार्लेश्वर हे महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. मात्र, दर्शनासाठी आलेल्या एका निष्पाप चिमुकलीचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या घटनेने मनाला मोठी वेदना झाली असून, पाटील कुटुंबावर ओढवलेल्या दुःखाची जाणीव असल्याचे आमदार निकम यांनी स्पष्ट केले. मार्लेश्वर तीर्थक्षेत्री दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे. भाविकांना सुरक्षित वातावरणात दर्शन घेता आले पाहिजे. विशेषतः डोंगराळ आणि निसर्गरम्य परिसर असल्याने येथे येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. संभाव्य धोकादायक ठिकाणांची पाहणी करून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे मत आ. निकम यांनी व्यक्त केले.

तीर्थक्षेत्राचा विकास होत असताना भाविकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होता कामा नये. विकासकामे करताना परिसरातील नैसर्गिक रचना, डोंगराची स्थिती आणि पर्यावरण यांचा विचार करणे अत्यावश्यक आहे. विकासकामांमुळे भाविकांच्या जीविताला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची दक्षता संबंधित विभागांनी घेतली पाहिजे. यासाठी प्रशासन, बांधकाम विभाग आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे.मार्लेश्वर येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता, दर्शनमार्गावरील धोकादायक ठिकाणे निश्चित करणे, आवश्यक ठिकाणी संरक्षक उपाययोजना करणे, सूचना फलक लावणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवणे महत्त्वाचे आहे. भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता कायमस्वरूपी सुरक्षिततेचे नियोजन करणे आवश्यक आहे. ऋत्वी पाटील या चिमुकलीच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. देवदर्शनासाठी आलेल्या कुटुंबाला असा दुःखद प्रसंग सहन करावा लागणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. एका निष्पाप जीवाच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. या घटनेतून संबंधित प्रशासनाने योग्य तो धडा घेऊन मार्लेश्वर तीर्थक्षेत्री येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी भूमिका आमदार शेखर निकम यांनी स्पष्ट केली.