हवामान अनुकूल डिजिटल, हरित तंत्रज्ञानाने कृषी क्षेत्रात क्रांती घडेल : कुलगुरू डॉ. संजय भावे

वेंगुर्ले येथे आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन..

वेंगुर्ले : दाजी नाईक
बदलत्या हवामानाने निर्माण केलेल्या आव्हानांवर हवामान अनुकूल डिजिटल आणि हरित तंत्रज्ञानाने कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्रात क्रांती घडेल, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी आज येथे केले. इंडियन सोसायटी ऑफ कोस्टल अॅग्रीकल्चरल रिसर्च (आयएससीएआर), कॅनिंग टाऊन, पश्चिम बंगाल; डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली; केंद्रीय मृदा लावनता अनुसंधान संस्थान, कर्नाल; दापोली चॅप्टर ऑफ आएससीएआर आणि इंटर डिसीप्लीनरी सोसायटी फॉर अॅडव्हानसमेंट ऑफ अॅग्रीकल्चरल सायंसेस अॅड टेक्नॉलॉजी, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात “किनारपट्टी आणि संलग्न कृषि परिसंस्थांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी हवामान अनुकूल डिजिटल आणि हरित तंत्रज्ञान” या विषयावरील चार दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटनपर सत्रात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कृत्रिम बुद्धीमत्ताचे कार्यक्रम संचालक प्राध्यापक अजित जावकर, इस्कार (इंटरनॅशनल सोसायटी फॉर कोस्टल अॅग्रीकल्चरल रिसर्च) चे सचिव आणि परिसंवाद आयोजन समितीचे सचिव डॉ. टी. डी. लामा, इस्कारचे अध्यक्ष डॉ. बी. माजी, कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय तोरणे, विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे, पंजाबच्या कपूरथला येथील राष्ट्रीय अक्षय्य ऊर्जा संस्थेचे महासंचालक डॉ. अतुल मोहोड, परिसंवादाचे स्थानिक सचिव डॉ. संतोष सावर्डेकर उपस्थित होते.

डॉ. भावे पुढे म्हणाले की, किनारपट्टीचे प्रदेश हे जगातील सर्वात उत्पादक वैविध्यपूर्ण आणि पर्यावरणीयदृष्टया संवेदनशील परिसंस्थांपैकी आहेत. जरी त्यांचा भौगोलिक विस्तार तुलनेने कमी असला तरी ते जागतिक लोकसंख्येच्या मोठ्या भागाला आधार देतात आणि अन्न उत्पादन, मत्स्य व्यवसाय, व्यापार, पर्यटन व आर्थिक विकासात महत्वपूर्ण योगदान देतात. भारतात सुमारे २५ कोटी लोक समुद्रकिनाऱ्यापासून ५० किलोमीटरच्या परिसरात राहतात. हा भाग नऊ किनारी राज्य आणि दोन केंद्र शासित प्रदेशांमध्ये पसरलेला आहे. या किनारी परिसंस्था केवळ शेतीसाठीच महत्त्वाच्या नाहीत तर मत्स्य व्यवसाय, मत्स्यशेती, जैवविविधता संवर्धन, सागरी संसाधने, पर्यटन आणि उदयोन्मुख निलअर्थव्यवस्थेमध्येही महत्वपूर्ण भूमिका बजावतात. बदलते हवामान किनारपट्टीच्या प्रदेशांत कृषि उत्पादकता, पोषण सुरक्षा, अन्नसुरक्षा आणि किनारपट्टीवरील समुदायांच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीवर थेट परिणाम करणारी अनेक आव्हाने निर्माण करत असल्याने शास्त्रज्ञांनी हवामान अनुकूल डिजिटल आणि हरित तंत्रज्ञानाने त्यावर मात करण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर परिसंस्थांच्या विकासासाठी व्हायला हवा : डॉ. अजित जावकर
या उदघाटन समारंभाचे प्रमुख अतिथी डॉ. अजित जावकर यांनी मार्गदर्शन करताना कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर परिसंस्थांच्या विकासासाठी व्हायला हवा. किनारपट्टी भागातील समुदायाच्या समस्यांच्या निवारणाकरिता तंत्रज्ञान निर्माण होणे आवश्यक आहे, असे विचार व्यक्त केले.

तर संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. माजी यांनी परिसंवादाचे महत्त्व विषद करताना परिसंस्थांमधील आव्हानांचा परिणाम उपजिविकेवर होऊ लागला असल्याने संशोधनाची नवी दिशा ठरवण्याची गरज आहे, असे सांगितले.

प्रगतशील शेतकऱ्यांचा कुलगुरूंच्या हस्ते सन्मान
यावेळी कोकण विभागातील प्रगतशील शेतकरी सर्वश्री निलिकेश दळवी (कर्जत), जयप्रकाश चमणकर (वेंगुर्ला), श्रीमती कांचन बर्वे (लांजा), नितीन कुबल (वेंगुर्ला), माधव शेट्ये (दापोली), प्रसन्न गोगटे (देवगड), मिलिंद सावंत (रत्नागिरी) सचिन दळवी (वेंगुर्ला आरवली), सचिन तोडणकर (दापोली), संदीप राणे (कणकवली), मिथीलेश देसाई (लांजा), शिवप्रसाद देसाई (सिंधुदुर्ग), प्रमोद दळवी (वेंगुर्ला), आदेश बरडे (वेंगुर्ला), विजय सावंत (कणकवली), संदीप माने (वेंगुर्ला), निलेश घाटकर (रत्नागिरी), जनार्दन तेली (देवगड), यांचा कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या हस्ते शाल आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सन्मानार्थी शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी इस्कार तर्फे डॉ. जेएसपी यादव सर्वोत्कृष्ठ संशोधनपर लेखासाठी डॉ. पी. बी. वणवे यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम रू. ५,०००/- देऊन गौरविण्यात आले. इस्कार फेलोशिप पुरस्कार डॉ. यू. भगवती अमाल, (पुद्दुचेरी), डॉ. यू. के. मंडल (पश्चिम बंगाल), डॉ. लक्ष्मीकांत नायक (कोलकाता), डॉ. अनिल चिंचमालतपुरे (भरूच, गुजरात), यांना फेलोशिप पुरस्काराने कुलगुरू डॉ. भावे यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचा शाल, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. परिसंवादाच्या स्मरणिकेचे आणि डॉ. यशवंत गोवेकर व सहकारी यांच्या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात वंदे मातरम, महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गिताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. टी. डी. लामा यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मकरंद करमरकर यांनी केले. आभार डॉ. संतोष सावर्डेकर यांनी मानले. कार्यक्रमाला कोकण विभागीय सहसंचालक शिवाजीराव आमले यांच्यासह २५० शास्त्रज्ञ, ५० विद्यार्थी, २५ प्रगतशील शेतकरी, २५ उद्योजक प्रामुख्याने उपस्थित होते. या परिसंवादाच्या आयोजनामध्ये प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.