चिपळूण ते संगमेश्वर दरम्यान रस्त्यातील खड्ड्यांची मलमपट्टी

तर असुर्डेतील तुटलेले रेलिंग रस्त्यावर

गौरव पोंक्षे माखजन :
पनवेल ते कन्याकुमारी या रस्त्यावर चिपळूण ते संगमेश्वर दरम्यान अनेक ठिकाणी भेगा व खड्डे पडले आहेत.काही ठिकाणी रस्ता खडबडीत झाला आहे.या विषयी च्या बातम्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्यावर आता या खड्ड्यावर भर उन्हातून मलमपट्टी केली जात आहे.
रस्त्याचे काँक्रीटीकरण हे कमी तापमानात थंड वेळी रात्रीचे करण्यात आले.शास्त्रीय दृष्ट्या काँक्रीट मधील पाण्याचे बाष्पीभवन लगेंच होऊ नये.व वेळेपूर्वी काँक्रीट सुखू नये हे असते.इतक्या सगळ्या बाबी पाळून देखील रस्त्याची ही गंभीर अवस्था पाहायला मिळत असताना ,खड्डे आणि भेगा चक्क दुपारच्या रणरणत्या उन्हात भरल्या जात आहेत.असे खड्डे आणि भेगा भरल्याने काहीच दिवसात सिमेंट चा चुरा होऊन पुन्हा भेगा पडलेल्या पाहायला मिळत आहेत.
शासनाकडून केवळ वेळ मारून नेऊन,वाहन धारक व प्रवाशांचे समाधान केले जात आहे.रात्री नाही पण सकाळी लवकर हे खड्डे व भेगा का बुजावल्या जात नाहीत असा सवाल सध्या विचारला जात आहेत.डागडुजीच्या कामावर कोणत्याही प्रकारे पाणी देखील मारले जात नसल्याने,काही दिवसातच खड्डे जैसे थे होत आहेत.
असुर्डे घाटात मुंबई कडे जातात सुमारे ४० फूट रेलिंग तुटून रस्त्यावर आले आहे.याकडे अद्याप शासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही.रेलिंग लोखंडी असल्याने याचा धोका वाहन चालकांना होऊ शकते.अनेक वाहने घासल्याचे प्रकार देखील होत आहे.दुचाकिस्वार रात्रीचे अंधारात रेलिंग ला आदळल्यास लोखंडी धार धार पत्र्यामुळे मोठा अनर्थ घडू शकतो.येथे अपघात झाल्यावरच रेलिंग ची दुरुस्ती होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
चिपळूण संगमेश्वर दरम्यान असलेले खड्डे,भेगा ह्या रस्ते काँक्रीटीकरणाच्या नियमानुसार थंड वेळी भराव्यात व त्यावर योग्य वेळा पाणी पडावे अशी मागणी केली जात आहे.