कशेडी येथे बोलेरो पिकअपच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू; ओळख पटविण्यासाठी खेड पोलिसांचे आवाहन

खेड (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील कशेडी, ओझरवाडी येथे बोलेरो पिकअप वाहनाच्या धडकेत एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी २० नोव्हेंबर रोजी रात्री घडली. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ५५ ते ६० वर्षे असून, त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. या मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी खेड पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २० नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर कशेडी, ओझरवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी येथे हा अपघात घडला. बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एमएच ०८ बीके ०९५४ वरील चालकाने रस्त्यावर असलेल्या अंदाजे ५५ ते ६० वर्षे वयोगटातील अनोळखी व्यक्तीला धडक दिली. या धडकेत संबंधित व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दुखापत गंभीर असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३५८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १६०(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात मृत झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसल्याने पोलिसांकडून त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
मृत व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यात आले असून, ओळख पटविण्याच्या दृष्टीने मृतदेह राखून ठेवण्यात आला आहे. खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांना याबाबत अवगत करण्यात आले असून, आपल्या गावातील किंवा परिसरातील एखादी व्यक्ती बेपत्ता आहे का, याची माहिती घेऊन मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मृत व्यक्ती आपल्या गावातील किंवा परिचयातील असल्याची माहिती मिळाल्यास त्यांच्या नातेवाईकांसह तात्काळ खेड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. यासाठी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक उदय भोसले यांच्याशी मोबाईल क्रमांक ९१३०३३४६१६ वर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
या अपघातातील मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा आणि पोलिसांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन खेड पोलीस ठाण्याकडून करण्यात आले आहे.