घुमरी, साखरी, वडवली, तिडे आदी गावांतील ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश; नगरपंचायतीसह १६ ग्रामपंचायतींवर लक्ष केंद्रित
मंडणगड (प्रतिनिधी):
मंडणगड नगरपंचायत तसेच तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला असून, गावागावातील ग्रामस्थांचा शिवसेनेकडे ओढा वाढताना दिसत आहे. गत आठवड्यात मुंबई व स्थानिक पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमांत घुमरी, साखरी, वडवली, तिडे आदी गावांतील ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. गृहराज्यमंत्री तथा आमदार योगेश कदम यांचे नेतृत्व आणि तालुक्याच्या विकासाचे व्हिजन असलेली त्यांची लोकाभिमुख कार्यपद्धती यावर जनतेचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे या पक्षप्रवेशांमधून दिसून येत आहे.
२०२६ या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवत विरोधकांवर मात केली होती. पंचायत समितीवर चार विरुद्ध शून्य असे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत सत्ता मिळवली, तर जिल्हा परिषदेतही आपले राजकीय बळ सिद्ध करीत जिल्हा परिषद अध्यक्षपद मंडणगड तालुक्याला मिळवून दिले. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या राजकारणात शिवसेनेने आपला वरचष्मा कायम राखला आहे.
गेल्या काही वर्षांतील राजकीय घडामोडींनंतर तालुका पातळीवर शिवसेनेसमोर सक्षम राजकीय आव्हान उभे करणारा प्रबळ विरोधक सध्या दिसत नसल्याचे राजकीय चित्र आहे. वर्षअखेरीस ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल लागल्याने सर्वच राजकीय पक्ष संघटनात्मक पातळीवर आपापला जनाधार आणि मतदानाची टक्केवारी कायम राखण्यासाठी प्रयत्नशील झाले आहेत. मात्र, केंद्र व राज्य शासनाच्या सत्तेचा लाभ ग्रामस्तरापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने शिवसेना संघटनात्मक विस्तारावर अधिक भर देताना दिसत आहे.
केंद्र, राज्य, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर आपले राजकीय वर्चस्व निर्माण केल्यानंतर आता नगरपंचायत आणि ग्रामपंचायत स्तरावरही संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्याची संधी शिवसेनेसमोर आहे. इतर पक्षांच्या तुलनेत ग्रामस्तरावरही शिवसेनेचे संघटनात्मक जाळे आणि कार्यकर्त्यांची ताकद मजबूत असल्याचे दिसत आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमधील यशामुळे हे संघटन अधिक बळकट होईल, या अपेक्षेने पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागले आहेत.
केंद्र व राज्य शासनाच्या ग्रामविकासाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरही पक्षाची मजबूत राजकीय पकड असणे महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे तालुक्यातील सोळाच्या सोळा ग्रामपंचायतींसह मंडणगड नगरपंचायतीच्या सत्तेच्या चाव्या आपल्याच हाती ठेवण्याच्या दृष्टीने शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आगामी निवडणुकांच्या माध्यमातून तालुक्यातील क्रमांक एकचा राजकीय पक्ष म्हणून आपले स्थान अधिक भक्कम करण्यासाठी शिवसेना पुन्हा एकदा सज्ज झाल्याचे सध्याच्या राजकीय घडामोडींवरून दिसून येत आहे.













