खेड रेल्वे स्थानकात रशियन पर्यटकाने गिटारवर गायले ‘ॐ नमः शिवाय’; प्रवाशांचे वेधले लक्ष

खेड (प्रतिनिधी) : कोकण रेल्वे मार्गावरील खेड रेल्वे स्थानकात एका रशियन पर्यटकाने गिटारवर ‘ॐ नमः शिवाय’ हे भक्तीगीत गायल्याचा अनोखा प्रसंग रविवारी दुपारी पाहायला मिळाला. परदेशी पर्यटकाच्या सुरेल गायनाने रेल्वे स्थानकातील वातावरण काही काळ भक्तिमय झाले.
मुंबईहून मडगावच्या दिशेने प्रवास करणारा हा रशियन पर्यटक रविवारी दुपारी खेड रेल्वे स्थानकात गाडीची वाट पाहत थांबला होता. यावेळी त्याने आपल्या गिटारवर सुरेल चाल धरत ‘ॐ नमः शिवाय’ हे गीत गायले. गिटारच्या सुरांवर त्याने गायलेल्या या भक्तीगीताने स्थानकात उपस्थित प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले.
विशेष म्हणजे, हे गीत गाण्यामागे ध्यानधारणेची भावना असल्याचे या पर्यटकाने सांगितले. संगीताच्या माध्यमातून मनःशांती मिळवण्याचा हा त्याचा प्रयत्न असल्याचे त्याच्या गायनातून जाणवले. परदेशी पर्यटकाच्या मुखातून भारतीय भक्तीगीत ऐकण्याचा अनुभव उपस्थित प्रवाशांसाठी अनोखा ठरला.
देश, भाषा आणि संस्कृती वेगवेगळी असली तरी संगीत आणि अध्यात्म माणसांना एकत्र आणण्याची ताकद ठेवतात, याचा सुंदर प्रत्यय खेड रेल्वे स्थानकातील या प्रसंगातून आला. या रशियन पर्यटकाच्या गिटारवरील ‘ॐ नमः शिवाय’ गायनाचा व्हिडिओ प्रवाशांमध्ये चर्चेचा विषय ठरला.