आडाळी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा घ्यावी

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

दोडामार्ग । प्रतिनिधी : आडाळी औद्योगिक क्षेत्रातील भूखंडधारक उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी आवश्यक असलेल्या विविध प्रशासकीय प्रक्रिया आणि ऑनलाइन व ऑफलाइन कार्यपद्धतींची माहिती एकाच ठिकाणी मिळावी, यासाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या समवेत आडाळी सरपंच पराग गावकर, प्रशांत जाधव आणि बाबा धुरी यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन यासंदर्भातील निवेदन सादर केले.

​उद्योगमंत्र्यांच्या कार्यतत्परतेमुळे आडाळी औद्योगिक क्षेत्रातील अनेक प्रलंबित प्रश्न सध्या मार्गी लागत आहेत. गेल्या वर्षभरापासून रखडलेले भूखंड वाटप आणि इतर तांत्रिक प्रक्रिया अलीकडच्या काळात पूर्ण झाल्यामुळे ६० हून अधिक उद्योजकांनी प्रत्यक्ष उद्योग उभारणीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. मात्र, या औद्योगिक क्षेत्रातील बहुतांश भूखंडधारक हे गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक उद्योजक आहेत. उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रियेबाबत त्यांना पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याने त्यांचा मोठा वेळ खर्ची पडत असून, परिणामी प्रत्यक्ष उद्योग उभारणीला विलंब होत आहे.

​या पार्श्वभूमीवर, उद्योजकांना एकाच छताखाली महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सर्व आवश्यक माहिती, तांत्रिक मार्गदर्शन आणि प्रशासकीय प्रक्रियेच्या पूर्ततेबाबत सविस्तर माहिती मिळाल्यास उद्योग उभारणीच्या कामाला मोठी गती मिळेल, तसेच महामंडळाच्या कामकाजाबाबत उद्योजकांमध्ये सकारात्मकता निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आडाळी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांसाठी तातडीने मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाला द्याव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रुप ग्रामपंचायत आडाळी आणि आडाळी औद्योगिक क्षेत्र विकास समिती सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.