डॉक्टर व महिलेच्या पतीला अटक; घटनेने संगमेश्वर तालुक्यात खळबळ
या प्रकरणामागील नेमके सूत्रधार कोण आहेत? प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का?
संबंधित डाँक्टरने यापुर्वीही असे प्रकार केले आहेत का? डाँक्टरचा गाँडफादर कोण आहे का? पोलीस तपासात उलगडा होण्याची शक्यता
देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे स्त्रीभ्रृण हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी डॉक्टर तसेच करवीर येथील पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, डॉक्टर आणि पतीला पोलिसांनी अटक केली आहे. स्त्रीभ्रूणहत्येसारख्या गंभीर आणि समाजाला काळिमा फासणाऱ्या प्रकारामुळे पुन्हा एकदा मुलींच्या जन्माबाबतची सामाजिक मानसिकता आणि अशा गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या प्रकरणामागील नेमके सूत्रधार कोण आहेत? प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? संबंधित डाँक्टरने यापुर्वीही असे प्रकार केले आहेत का? डाँक्टरचा गाँडफादर कोण आहे का? याचा उलगडा पोलीस तपासात होण्याची शक्यता आहे.
साखरपा येथे करवीर तालुक्यातील दांम्पत्याने स्त्री भ्रृण हत्या केल्याचा हा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी संबंधीत डॉक्टरसह पती, पत्नीवर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिला ही जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. डॉक्टर व पतीला सोमवारी अटक करुन देवरुख न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायाधीशांनी २७ पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. करवीर तालुक्यातील एक दांम्पत्य गर्भपात करण्यासाठी १९ रोजी साखरपा येथील एका डॉक्टरकडे आले होते. सदर महिलेचा गर्भपात करत असताना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. या प्रकारामुळे संबंधीत डॉक्टर व दांम्पत्य भयभीत झाले. उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले.
येथील स्त्रीरोग तज्ज्ञांनी तपासणी केल्यानंतर स्त्री भ्रृण हत्येचा संशय येथील डॉक्टरांना आला. अधिक लक्ष केंद्रीत केल्यानंतर हा स्त्री भ्रृण हत्येचा प्रकार असल्याची खात्री वैद्यकीय सुत्रांना पटली. त्यावरून रत्नागिरी येथील जिल्हा शल्यचिकीत्सकांनी गर्भपात करणारे साखरपा येथील डॉक्टर व सदर दांम्पत्यावर स्त्री भ्रृणत्येचा गुन्हा दाखल करण्याचा अहवाल त्यांनी पोलीसांना दिला. यावरून देवरुख पोलीस ठाण्यात डॉक्टरसह पती पत्नीवर भारतीय न्याय संहिता ८८, १२५ ब व गर्भधारणा पुर्ण व प्रसवपुर्व रोगतंत्रे अधिनियम १९९४ चे कलम ४, ५ (२), २३ (१), २३ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव करीत आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून लांज्याचे पोलीस उपअधिक्षक सुरेश कदम यांनी सोमवारी सायंकाळी देवरुख पोलीस ठाण्यात भेट देवून तपासाबाबत मार्गदर्शन केले. तसेच सदर डॉक्टरवर करवीर येथे सन २०२४ मध्ये स्त्री भ्रृण हत्येचा गुन्हा दाखल असल्याची माहिती श्री. कदम यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान, साखरप्यात स्री भ्रृण हत्येचा प्रकार उघडकीस आल्याने संताप व्यक्त होत आहे.













