शासकीय जिल्हास्तरीय टेनिक्वाईट स्पर्धेत ज्ञानदीप प्रशालेचे यश; तृतीय क्रमांक पटकावला

खेड (प्रतिनिधी) : शासकीय शालेय जिल्हास्तरीय टेनिक्वाईट स्पर्धेत ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, सीबीएसई, मोरवंडे-बोरज येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे प्रशालेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या स्पर्धेत ज्ञानदीप प्रशालेचे सम्यक सचिन गमरे, केदार जयवंत आंब्रे आणि अर्सलान अब्दुल रहमान नदाफ हे इयत्ता अकरावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी, तसेच अरहान तजामूल मुल्लाजी हा इयत्ता अकरावी वाणिज्य शाखेचा विद्यार्थी सहभागी झाला होता. या विद्यार्थ्यांनी स्पर्धेदरम्यान सांघिक समन्वय, खेळातील कौशल्य, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास यांचे उत्तम प्रदर्शन केले. प्रतिस्पर्ध्यांना दमदार आव्हान देत त्यांनी तृतीय क्रमांक मिळवून प्रशालेचे नाव जिल्हास्तरावर उज्ज्वल केले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढ्ढा, विश्वस्त पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे, सल्लागार मंडळाचे सदस्य, प्रशालेचे प्राचार्य श्री. भरत मोरे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी क्रीडाशिक्षक श्री. आशिष देशमाने आणि हर्षदा पार्टे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाचे कौतुक करत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना भविष्यातील विविध क्रीडा स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या यशामुळे प्रशालेतील इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.