खेडमध्ये महायुती मधील भाजपा उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल

खेड  – नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना महायुतीतर्फे प्रभाग क्रमांक २ आणि ७ मधील अधिकृत उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया उत्साहात पार पडली. दोन्ही प्रभागांतील उमेदवारी अर्ज दाखल करताना पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती जाणवली.
प्रभाग क्रमांक २ मधील महायुती मधील भाजपाचे अधिकृत उमेदवार श्री. रहिम युसूफ सहिबोले व प्रभाग क्रमांक ७ मधील सौ. स्वप्नाली राकेश चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हा उमेदवारी अर्ज दाखल करताना भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष श्री. सतीश मोरे, माजी नगराध्यक्ष श्री. वैभव खेडेकर, शिवसेना शहरप्रमुख श्री. कुंदन सातपुते यांच्यासह भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान महायुतीचे ऐक्य आणि ताकद स्पष्टपणे दिसून आली. नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दाखवलेली एकजूट आणि सक्रियता पाहता या निवडणुकीत महायुती जोरदार तयारीत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.