पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश
देवगड : आनंदवाडी मत्स्य बंदरातील गाळ उपशाच्या कामाचा शुभारंभ माजी आमदार अजित गोगटे यांच्या हस्ते करण्यात आला. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या कामासाठी ड्रेझर दाखल झाल्यानंतर आता प्रत्यक्ष गाळ उपशाला सुरुवात झाली आहे. यामुळे आनंदवाडी मत्स्य बंदराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
आनंदवाडी मत्स्य बंदराचा विकास अनेक वर्षांपासून रखडलेला होता. काही काळ हे काम पूर्णपणे बंद होते, तर काही काळ अत्यंत संथगतीने सुरू होते. मात्र, पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्याकडे या खात्याची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी या प्रकल्पाला विशेष प्राधान्य दिले. बंदराच्या विकासासाठी स्वतंत्र निधी तसेच केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मागील महिन्यात यासंदर्भात पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन मच्छीमार, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा केली होती. यावेळी आवश्यक सूचना व प्रस्ताव मागवून त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात आली. त्यांच्या प्रयत्नांमुळे आता गाळ उपशाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
दरम्यान, गाळ उपशानंतर तो पुन्हा नदीपात्रात येणार नाही, याची योग्य खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे मत माजी आमदार अजित गोगटे यांनी व्यक्त केले. उपसा केलेल्या गाळाची विल्हेवाट योग्य ठिकाणी न लावल्यास या कामाचा अपेक्षित फायदा होणार नाही. त्यामुळे गाळ योग्य ठिकाणी टाकण्याबाबत आपण पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी नगरसेवक तसेच स्वच्छता सभापती निवृत्ती उर्फ बुवा तारी, देवगड मधील सर्व मच्छीमार सोसायट्यांचे चेअरमन यामध्ये द्विजकांत कोयंडे, विनायक प्रभू यांचा समावेश होता, उल्हास मंचेकर, संजय बांदेकर, उमेश कदम, गणेश कुबल, प्रदीप कोयंडे, दत्तप्रसाद भिलारे, दयानंद पाटील, मत्स्य परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने मच्छीमार बांधव उपस्थित होते.












