वाडोस येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कारवाई; संतोष व आनंद म्हाडगूत यांची अलौकिक शक्ती नसल्याची कबुली
कुडाळ-देवधर्माला विरोध न करता श्रद्धेच्या नावाखाली सर्वसामान्यांची आर्थिक, मानसिक व शारीरिक फसवणूक करणाऱ्या भोंदूगिरीविरोधात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मोहीम तीव्र केली आहे. याच मोहिमेअंतर्गत कुडाळ तालुक्यातील वाडोस येथे भोंदूगिरी करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संतोष म्हाडगूत व आनंद म्हाडगूत यांची भेट घेतली. समितीने दिलेले ८० लाख रुपयांचे आव्हान स्वीकारण्याआधीच दोघांनी आपल्यात कोणतीही अलौकिक शक्ती नसल्याचे मान्य करत भोंदूगिरी बंद करण्याचा लेखी कबुलीजबाब दिला.
समितीचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजीव बिले यांना संतोष म्हाडगूत हे वाडोस येथे आपल्या भावाच्या घरी रात्रीच्या वेळी अंगात देवाचे वारेसूत्र येत असल्याचे भासवून लोकांच्या समस्या सोडवत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार जिल्हा संघटक विजय चौकेकर यांच्याशी चर्चा करून ॲड. बिले यांनी सचिव अजित कानशिडे, विजय चौकेकर व विलास चेंदवणकर यांच्यासह रात्री उशिरा वाडोस येथे भेट दिली.
यावेळी मंगेश म्हाडगूत यांच्या घरी भाविकांची गर्दी जमली होती. संतोष म्हाडगूत व आनंद म्हाडगूत हे अंगात पूर्वजांचे वारेसूत्र आल्याचा आभास निर्माण करून भाविकांच्या समस्या ऐकत होते. त्यांना विभूती देऊन विविध उपाय सांगितले जात असल्याचे समितीच्या सदस्यांच्या निदर्शनास आले.
समितीचे पदाधिकारी आल्याची चाहूल लागताच हे वारेसूत्र थांबले. त्यानंतर समितीच्या सदस्यांनी दोघांना ८० लाख रुपयांचे खुले आव्हान दिले. खरोखरच अलौकिक शक्ती अंगात येत असल्यास समितीने विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे द्यावीत, अन्यथा भोंदूगिरी कायमची बंद करावी, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी विजय चौकेकर यांनी महाराष्ट्रातील जादूटोणाविरोधी कायद्याची माहिती देत त्यातील शिक्षेच्या तरतुदी व दंड याबाबत उपस्थितांना समजावून सांगितले. कायदेशीर कारवाईची माहिती मिळताच संतोष म्हाडगूत व आनंद म्हाडगूत यांनी आपल्यात कोणतीही अलौकिक शक्ती येत नसल्याचे मान्य केले. तसेच आजपासून लोकांना फसविण्याचे प्रकार बंद करणार असल्याचा लेखी कबुलीजबाब दिला.
छोट्या-मोठ्या समस्यांवर उपाय शोधताना अशा व्यक्तींच्या आहारी जाऊन स्वतःची फसवणूक करून घेण्याऐवजी समस्यांचे मूळ कारण शोधावे, विवेकवादी दृष्टिकोन स्वीकारावा आणि वैज्ञानिक विचारसरणीने जीवन जगावे, असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी केले आहे.













