<h6>नाडण येथे ५१, तर नारिंग्रे येथे ३४ रक्तदात्यांचे योगदान</h6><h6>सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या पुढाकारातून सामाजिक उपक्रमाचे आयोजन</h6>देवगड : त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवानिमित्त देवगड तालुक्यातील नाडण आणि नारिंग्रे येथे आयोजित रक्तदान शिबिरांना रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या दोन्ही शिबिरांमध्ये एकूण ८५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ रोजी या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
नाडण येथील श्री महादेश्वर मंदिरात श्री महादेश्वर कला व क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरातील रक्तसंकलन जिल्हा रक्तपेढी, ओरोस (सिंधुदुर्गनगरी) यांच्या वतीने करण्यात आले.
नारिंग्रे येथील गांगेश्वर मंदिराजवळ युवा रक्तदाता ग्रुप, दहिबाव-बागमळा-नारिंग्रे यांच्या वतीने कुलसुम ॲग्रोटेक व शिवप्रेमी शिवमुद्रा यांच्या सहकार्याने सिंधू रक्तक्रांती मिशन (२०२५-२०३०) अंतर्गत २१ व्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ३४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. येथील रक्तसंकलन नवजीवन रक्तपेढी, कणकवली यांच्या मार्फत करण्यात आले.
दोन्ही ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने रक्तदान शिबिरे पार पडली. या सामाजिक उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे, आयोजक मंडळांचे तसेच रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांचे सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग शाखा देवगड यांच्या वतीने सचिव प्रकाश जाधव यांनी आभार मानले.













