स्वप्निल कदम कुडाळ :
विकासकामांना आता खऱ्या अर्थाने गती मिळत असून, मागील दहा वर्षांपासून रखडलेली कामे मार्गी लागत आहेत. २०१३ मध्ये निविदा (टेंडर) प्रक्रिया पूर्ण झालेल्या; मात्र अद्याप प्रलंबित असलेल्या विकासकामांसाठी आगामी हिवाळी अधिवेशनात भरीव निधी उपलब्ध करून घेणार असल्याचा निर्धार आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला आहे.
मिठागर धरणाबाबत अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना
घोटगे येथील मिठागर धरणासाठी ६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या प्रकल्पाची सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊनही अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, आमदार निलेश राणे यांनी या कामाची सविस्तर माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे स्पष्ट केले.
घोटगे येथील मिठागर धरण प्रकल्प स्थानिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. धरणाच्या आजूबाजूला डोंगराळ भाग असल्याने येथे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होण्याची क्षमता आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण झाल्यास पंचक्रोशीतील घोटगे, जांभवडे, भरणी, कुपवडे आणि सोनवडे या गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होणार आहे.
भविष्यात उद्भवणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, धरणाचे काम युद्धपातळीवर आणि जलद गतीने पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे. आमदार निलेश राणे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे रखडलेल्या मिठागर धरणाच्या कामाला आता तरी प्रत्यक्ष सुरुवात होईल, अशी आशा पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.













