२७ नोव्हेंबरपासून सावरकर नाट्यगृहातील रांग I, J, K ची तिकिटे ऑनलाईन उपलब्ध
रत्नागिरी : रत्नागिरीतील नाट्यरसिकांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सध्या सुरू असलेल्या ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील पुढील सर्व नाटकांसाठी आता ऑनलाईन तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
रत्नागिरी केंद्रावरील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात सुरू असलेल्या या स्पर्धेला रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांची होणारी गर्दी आणि तिकिटासाठी लागणाऱ्या रांगा लक्षात घेऊन, शुक्रवार, दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ पासून स्पर्धेतील उर्वरित सर्व नाटकांसाठी सभागृहातील निवडक रांगा (रांग – I, J, आणि K) ऑनलाईन आरक्षणासाठी खुल्या करण्यात आल्या आहेत.
नाट्यरसिकांना आता घरबसल्या ticketkhidakee.com या वेबसाईटवरून किंवा TicketKhidakee या मोबाईल ॲपवरून आपली तिकिटे आरक्षित करता येणार आहेत. स्पर्धेतील उर्वरित प्रयोगांचा आनंद घेण्यासाठी रसिकांनी या ऑनलाईन सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.












