रत्नागिरी : वाहनाच्या धडकेनंतर जखमी बिबट्या महामार्गावर बसला; नंतर बागेत शिरल्याने खळबळ!

रत्नागिरी : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मलूष्टे फार्महाऊस आणि चांद-सूर्या परिसरात शुक्रवारी रात्री बिबट्याच्या अपघाताची घटना घडली. रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने बिबट्याला जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

वाहनाची धडक बसल्यानंतर हा बिबट्या काही काळ महामार्गावरच बसून राहिला. त्यामुळे महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांमध्ये एकच खळबळ उडाली. बिबट्याला पाहण्यासाठी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर हा बिबट्या महामार्गालगत असलेल्या बागेत शिरल्याचे समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बिबट्या जखमी असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, बागेत शिरलेल्या बिबट्याचा शोध घेण्याचे आणि पुढील आवश्यक कार्यवाहीचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात भीती आणि उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.