दाभोळमध्ये आंबा बागेत आढळलेल्या मगरीची वनविभागाकडून सुरक्षित सुटका

दापोली (विशेष प्रतिनिधी) : दापोली तालुक्यातील दाभोळ येथील आंबा बागेत असलेल्या पाण्याच्या खड्ड्यात मगर आढळल्याची घटना समोर आली. ग्रामस्थ श्री. केतन मोरे यांच्या आंबा बागेतील पाण्याच्या खड्ड्यात मगर असल्याची माहिती २७ नोव्हेंबर रोजी वनविभागाला मिळाली.
माहिती मिळताच दापोली वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सुमारे अडीच मीटर लांबीच्या मगरीला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. या बचावकार्यामध्ये वनपाल दापोली श्री. रामदास खोत, वनरक्षक चिवळंबकर झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रादेशिक वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती गिरिजा देशाई, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल दापोली आर. आर. पाटील यांनी सहभाग घेतला.
दापोली तालुक्यात वन्यजीव लोकवस्तीत आल्यास, जखमी अवस्थेत, अनाथ अवस्थेत किंवा निदर्शनास आल्यास तात्काळ दापोली वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वनविभागाने हेल्पलाइन क्रमांक १९२६ तसेच वनक्षेत्रपाल दापोली आर. आर. पाटील यांचा संपर्क क्रमांक ९८४७०७६४३८ यावर माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
वन्यजीवांना त्रास न देता त्यांची माहिती वनविभागाला देऊन सुरक्षित बचावकार्य करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.