उपसभापती निलेश सुर्वे यांचे विशेष प्रयत्न तर सभापती प्रणव पोळेकर यांच्या उपस्थितीत वाटप
गुहागर प्रतिनिधी :
प्रणवतीर्थ चारीटेबल ट्रस्ट पुणे व चैतन्य सॉफ्टवेअर पुणे यांच्या माध्यमातून गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ११ प्राथमिक शाळांना ई लर्निंग साहित्य देण्यात आले. या शाळांना ई लर्निंग साहित्य उपलब्ध होण्यासाठी पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे व भाजपा तालुका सरचिटणीस सचिन ओक यांनी विशेष प्रयत्न केले होते. गुहागर तालुक्याचे सभापती प्रणव पोळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जि प आदर्श शाळा शिर नं.१ येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील समुद्रातील अति प्राचीन अशा भिंतीचा शोध लावणारे ज्येष्ठ इतिहास व पुरातत्व विभागाचे संशोधक सन्मा.डॉ.अशोक मराठे यांनी आपली शासकीय सेवेतील कारकीर्द संपल्यानंतर ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रणवतीर्थ चारिटेबल ट्रस्ट स्थापन करून या संगणकीय प्रगतीचा ध्यास घेतला आहे आणि याला विशेष सहकार्य लाभलेले आहे ते चैतन्य सॉफ्टवेअर पुणे यांचे. या दोन्ही संस्थांकडे उपसभापती निलेश सुर्वे आणि भाजपाचे तालुका सरचिटणीस सचिन ओक व डॉक्टर कैलास वैद्य (नरवण) यांच्या माध्यमातून या ई लर्निंग साहित्यासाठी पाठपुरावा चालू होता. यांची धडपड लक्षात घेऊन या चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.अशोक मराठी सर, ट्रस्टी अश्विन महाजन, नीता गांधी, नरेंद्र नांदुरकर, अवधूत नांदूरकर, संजय देशपांडे, प्रज्ञा देशपांडे यांनी गुहागर तालुक्यातील ११ शाळांना ई लर्निंग साहित्य भेट दिले आहे. यामध्ये कोतळुक शाळा नं. १, कर्दे शाळा नं १, मासू शाळा नं.१, काताळे नवानगर उर्दू, शीर शाळा नं.१,पिंपर शाळा नं.१,पडवे उर्दू, तवसाळ बाबरवाडी, तवसाळ तांबडवाडी, काताळे शाळा नं.१,तवसाळ शाळा नं .१ या शाळांना ई लर्निंग साहित्याचे सेट देण्यात आले. यावेळी शीर पंचायत समिती सदस्य स्नेहा ताई शिगवण, शीर शाळा समिती अध्यक्ष विद्याधर गुरव, शीर तंटामुक्त समिती अध्यक्ष बाळकृष्ण शिर्के, नयन गुरव, पोलीस पाटील पूर्वा भाटकर, सागर काटदरे, विजय मसुरकर,जद भाटकर, नाईफ बावडे,प्रकाश मोरे, पांडुरंग नाचरे,चेतन गुरव,राजेश सुर्वे, मिलिंद टक्के, वेदिका शहाणे शांताराम डावल, राहुल पवार, हेमंत गुरव,समीर मोरे आदींसह सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन शीर शाळा नं.१ चे मुख्याध्यापक सुहास गायकवाड, केंद्रप्रमुख सुहासिनी गायकवाड,सह शिक्षक अजय खेराडे, सौ रेडेकर मॅडम यांनी केले होते.













