“अभंग रेकॉड्स” आयोजित दशावतार अभिनय स्पर्धत कु. पार्थ सामंत प्रथम

सावंतवाडी । प्रतिनिधी : मुंबईच्या “अभंग रेकॉड्स” आयोजित बाल कलाकारांसाठी ऑनलाईन दशावतार एकपात्री अभिनय स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून या स्पर्धेसाठी एकूण ३६ जणांनी सहभाग घेतला होता त्यातील प्रथम क्रमांकाचा मानकरी कु. पार्थ प्रदीप सामंत याने साकारलेला भक्त प्रल्हाद ठरला तर द्वितीय क्रमांकाचा मान कु. जयंत धर्मेंद्र मेस्त्री याच्या दशरथ राजाला मिळाला.तृतीय क्रमांक कु. चंदन अंकुश गरुड याचा क्रोधासुर आणि उत्तेजनार्थ अनुक्रमे कु. अनुप गणेश देवळी (नारद), कु. सदाशिव सूर्यकांत गावडे (ब्रम्हराक्षस), कु. मिहिर विनायक दाभोळकर (भीमराक्षस) या भुमिकांना देण्यात आले.

या स्पर्धेतील सर्व बक्षिसे ही कु. सौरभ बाळकृष्ण आंगचेकर आणि श्री. बाळकृष्ण वासुदेव आंगचेकर (अभंग रेकॉड्स ) यांनी पुरस्कृत केली असुन विजेत्यांना रोख रूपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन लवकरच अभंग रेकॉड्स च्या माध्यमातून गौरवण्यात येणार आहे.ही दशावतार एकपात्री अभिनय स्पर्धा विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी व या समृध्द लोककलेची आवड भावी पिढीमध्येही वाढावी या दृष्टीने घेण्यात आली असल्याची भावना कु. सौरभ आंगचेकर यांनी या वेळी व्यक्त केली तसेच ही स्पर्धा आयोजित करण्याची प्रेरणा त्यांना बाल कलाकार वीर गावडे (अणसुर) याचा इंस्टाग्रामवरील व्हिडिओ पाहून सुचल्याचेही त्यांनी सांगितले.या स्पर्धेचे अंतिम परिक्षण लौकिक प्राप्त कलावंत नटवर्य नटश्रेष्ठ श्री. पप्पू नांदोसकर यांनी केले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे “अभंग रेकॉड्स” यांनी कौतुक केले असून विजेत्या सर्व स्पर्धकांना लवकरच मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार असल्याची माहिती अभंग रेकॉड्स यांनी दिली.