दलवाई हायस्कूल मिरजोळीचा अनोखा उपक्रम
चिपळूण (वार्ताहर) : मिरजोळी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दलवाई हायस्कूलमध्ये सोमवार दि. २ ऑक्टोबर गांधी जयंती व बहादूर शास्त्री जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी झाली. मुख्याध्यापक रोहित जाधव व प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. आघाव यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे दूसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी मिरजोळी, कोंढे, शिरळ, रेहेळ-भागाडी या चार गावांमध्ये एकाचवेळी प्लास्टिक संकलन केले.
प्रशालेतील शिक्षिका सौ. बोराटे यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या राजकीय कार्याविषयी माहिती सांगितली. गांधीजीच्या जीवनातील स्वच्छतेचे महत्व व प्लॅस्टिकचे पर्यावरणाला होणारे दुष्परिणाम याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक श्री. जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री. जाधव यांच्या संकल्पनेतील एक अभिनव उपक्रम यशस्वी केला. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी एकाचवेळी विभागून मिरजोळी, कोंढे, शिरळ, रेहेळ-भागाडी या गावांमध्ये प्लास्टिक संकलन मोहिम यशस्वी केली. मिरजोळी गावामध्ये प्लास्टिक संकलन मोहिमेमध्ये गावचे प्रभारी सरपंच गणेश निवाते, सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. या ठिकाणी प्रशालेतील विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक श्री. जाधव, श्री. आघाव, सौ. शिर्के, सौ. भोजने उपस्थित होत्या.
कोंढे फाटा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी घोषणा देत परिसर दुमदुमला. प्रशालेतील इ. ७ वी तील विद्यार्थिनी कु. दिया तांबिटकर हिने प्लास्टिकचे पर्यावरणाला होणारे दुष्परिणाम याविषयी माहिती सांगितली. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छते विषयक पथनाटय सादर केले. यामध्ये आयुष नटे, आयुष चव्हाण, निरंजन गुडेकर, गौरव गुरव, कु. सानिया माळी, ममता होळकर, अंकिता होळकर, दिव्या लोलम, गौरी मते, सिद्धी वरपे, चैत्राली बोलाई या विद्यार्थ्यांनी पथनाटय सादर केले. यावेळी कोंडे येथील उपसरपंच हसन खान, सदस्य, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. जाधव, व्यापारी मंडळ रिक्षा चालक मालक संघ यांचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. शिरळ येथे सरपंच शशीकांत राजन व ग्रामपंचायतीचे सदस्य, आरोग्य सेविका, अंगणवाडी शिक्षिका, ग्रामस्थ मंडळी यांनी प्लास्टिक संकलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. रेहेळ भागाडी येथे प्रशालेतील विद्यार्थिनी पृथ्वी अविनाश मोहिते हिने राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे दूसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. प्लॅस्टिकचे पर्यावरणाला होणारे दुष्परिणाम सांगितले.
यावेळी रेहेळ भागाड़ी, वैजी गावचे सरपंच सुनिल जाबरे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ग्रामस्थ, शिक्षक उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली. या प्रत्येक ठिकाणी मुख्याध्यापक रोहित जाधव यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. याप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थी कु. पार्थ प्रकाश कदम याने महात्मा गांधीजीची तर कु नैनिक संदिप मुकनाक याने लालबहादूर शास्त्री यांची वेशभूषा करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या संपूर्ण उपक्रमाबद्दल प्रशालेचे सर्व संस्था पदाधिकारी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी विद्यार्ध्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.











