कणकवली : सध्या इंटरनेट व मोबाईलच्या जगाचा उपभोग घेणारा सगळ्यात मोठा वर्ग म्हणजे तरुणाई आणि सायबर क्राईममध्ये अडकणारी देखील तरुणाईच. या तरुणाईला इंटरनेट किंवा मोबाईल वापरताना प्रामुख्याने पासवर्ड, प्रोफाईल सेटिंग, फेक मेसेज, व्हिडिओ, फोटो ऑनलाइन पेमेंट अशा विविध क्राईमबाबत कशी काळजी घ्यावी, याबाबत पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शेगडे यांनी मार्गदर्शन केले.
सिंधुदुर्ग पोलीस प्रशासन आणि एमकेसीएल सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून पोलीस स्टेशन कणकवली व एमकेसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने एस. एम. ज्युनियर कॉलेज कणकवली येथे सायबर सुरक्षा व दैनंदिन जीवनातील जागरुकता मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक शेडगे, एस. एम. ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य जी. एन. बोडके, उपप्राचार्य आर. एल. प्रधान, पर्यवेक्षक जी. ए. कदम यांच्यासह आयडियल कॉम्प्युटरच्या श्रीमती गायकवाड, मधुरा कॉम्प्युटरच्या रश्मी बाईत, प्रतिमा कॉम्प्युटरचे मोरे, ज्ञानकुंज कॉम्प्युटरचे मानसपुरे, वेदांत कॉम्प्युटरचे मालप, परफेक्ट कॉम्प्युटरचे घाडीगावकर आदी उपस्थित होते. श्रीमती बाईत यांनी विद्यार्थ्यांची ऑनलाइन गेममधून होणारी फसवणूक, आर्टिफिशीअल इंटेलिजन्सचा वापर करून होणारी फसवणूक, मोबाईलच्या आहारी जाऊन पालकांची केली जाणारी फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांच्या भावनेला हात घालत तरुणाईला जागृत केले. सूत्रसंचालन सौ. एम. पाटील यांनी तर आभार व्ही. गायकवाड यांनी मानले.











