‘त्या’ संशयित इंजिनियर ला दोन दिवस पोलीस कोठडी

खेड | प्रतिनिधी : कामाच्या बहाण्याने २७ वर्षीय विवाहितेस भरणे येथील एका रिसॉर्टमध्ये आणून तिच्याशी सतत शारीरिक संबंध ठेवत तिच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रवीण सुधाकर डोंगरे (५६ रा. भांडूप-मुंबई) न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सरकारी पक्षाच्यावतीने अॅड. स्मिता कदम यांनी काम पाहिले. त्याच्या पत्नीवरही अटकेची टांगती तलवार कायम आहे.

मुंबई-अंधेरी येथील एका कंपनीत एचओडी पदावर कार्यरत असलेल्या प्रवीण डोंगरे याने कामाच्या बहाण्याने पिडीत विवाहितेशी २०१९ ते २०२१ या कालावधीत सतत शारीरिक संबंध ठेवले. तसेच काही व्यक्तींसमवेत पिडीतेच्या कोलकत्ता येथील राहत्या घरी जावून पोलीस स्थानकात तक्रार केल्यास ठार मारण्याची धमकीही तिच्या कुटुंबियांना दिली होती. हा गुन्हा येथील पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडला असल्याने कागदपत्रे वर्ग झाल्यानंतर येथील पोलिसांनी प्रवीण डोंगरेला अटक केली आहे.

याप्रकरणात प्रवीण डोंगरे याच्या पत्नीनेही पिडीत विवाहितेस दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दिल्ली, माथेरान, लोणावळा अशा वेगवेगळ्या ठिकाणी घेवून जात तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आहेत. या प्रकरणात अन्य साथीदार, मित्र यांचा सहभाग आहे का, याचाही पडताळा करावा लागणार आहे, असा सरकारी वकील अॅड. स्मिता कदम यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने प्रवीण डोंगरे याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.