कॅनरा रोबेको असेट मॅनेजमेंट कंपनीच्या सी. एस. आर. फंडातून शैक्षणिक उपक्रम
चौके l प्रतिनिधी :कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड, असेट मॅनेजमेन्ट कंपनीच्या सी. एस. आर. फंडातून शुक्रवार २२ डिसेंबर रोजी मालवण तालुक्यातील श्री शिवाजी विद्यामंदिर काळसेच्या २५ विद्यार्थी विद्यार्थीनींना मोफत सायकलचे वाटप करण्यात आले.
यावेळी कंपनीचे ॲडमिन आणि आयटी हेड श्री. दिपेश गोसावी , गोवा ब्रॅंचचे मॅनेजर सुरज साळगांवकर , संकेत प्रभुदेसाई , स्नेहल मातोंडकर , काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक विनोद गोसावी , शरद गोसावी , वास्तू विशारद भूषण गोसावी ,मुख्याध्यापक तुकाराम पेडणेकर , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रशालेच्या वतीने श्री दिपेश गोसावी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड या कंपनीच्या सी एस आर फंडातून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यामध्ये विशेष करून शैक्षणिक संस्थांना सहाय्य केले जाते. त्यानुसार यावर्षी काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्री विनोद गोसावी यांच्या मागणीवरून तसेच संस्था अध्यक्ष श्री. हेमंत परब आणि मुख्याध्यापक श्री तुकाराम पेडणेकर यांच्या पाठपुराव्याने कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड या कंपनीच्या सी एस आर फंडातून काळसे हायस्कूल मधील शेतकरी कुटूंबातील २५ गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना मोफत सायकलचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना संचालक श्री विनोद गोसावी यांनी
प्रशालेतील विद्यार्थ्यांना मोफत सायकल उपलब्ध करून दिल्याबद्दल कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड या कंपनीचे आणि आयटी हेड श्री. दिपेश गोसावी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. आणि विद्यार्थ्यांनी स्वतःची काळजी घेत शारीरिक सुदृढतेसाठी शाळेत येण्याजाण्यासाठी सायकलचा वापर करावा. असे आवाहन केले.
यावेळी श्री दिपेश गोसावी यांनी पोस्ट आणि बॅंकेप्रमाणेच म्युच्युअल फंड हा देखील गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय असल्याचे सांगून कंपनीच्या सी एस आर फंड विषयी माहिती देउन या काळसे हायस्कूल सोबतच एस. एल . देसाई विद्यालय पाट येथील १५ आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारमाठ शाळेतील १० विद्यार्थ्यांनाही मोफत सायकल वाटप केल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी वेळेची बचत होण्यासाठी शाळेत येण्या जाण्यासाठी या सायकलचा वापर करावा असे सांगितले.
तर मुख्याध्यापक श्री तुकाराम पेडणेकर यांनी शालेय वयात विद्यार्थ्यांच्या शारीरिक सुदृढतेसाठी सायकल आवश्यक असून इंधन बचत आणि नैसर्गिक पर्यावरण समतोल राखण्यासाठी सायकलचा वापर होणे गरजेचे आहे असे सांगत विद्यार्थ्यांना मोफत सायकल उपलब्ध करून दिल्याबद्दल कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड कंपनीचे आणि अधिकारी दिपेश गोसावी यांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक शिक्षक अविनाश परब यांनी केले.












