ब्राह्मण सहाय्यक सेवा मंडळ लांजाची मागणी, आगार व्यवस्थापकांना निवेदन सादर
लांजा (प्रतिनिधी) लांजा बसस्थानकातून लांजा- पुणे ही बारमाही एसटी बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी ब्राह्मण सहाय्यक सेवा मंडळ लांजा आणि लांजावासीस यांच्याकडून करण्यात आली असून याबाबतचे निवेदन लांजा आगार व्यवस्थापक काव्या पेडणेकर यांना सादर करण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, लांजा तालुक्यातील, शहरातील आणि आजूबाजूच्या गावातील आज अनेक नागरिक, विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक कामाच्या निमित्ताने तसेच शिक्षण आणि व्यापारी, आजारी व्यक्ती, औषध उपचार घेण्यासाठी लांजा ते पुणे असा प्रवास करत असतात. मात्र लांजा येथून पुणे ला जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस सेवा उपलब्ध नसल्याने या सर्वांची गैरसोय होत आहे. आणि म्हणूनच ही बाब लक्षात घेऊन लांजा एसटी आगारा मार्फत लांजा ते कोर्ले दाभोळे साखरपा- मलकापूर- कोकरूड शेडगेवाडी- उंडाळे पाचवड फाटा- कराड- सातारा- पुणे स्वारगेट अशी एसटी बस सकाळी आठ वाजता सुरू करण्यात यावी. आणि पुण्यातून सदर बस रात्री नऊ वाजता परत येण्यासाठी सुटावी.
सदर बस सुरू करण्यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग देण्यात यावे. अशी व्यवस्था केल्यास तुमच्या आगाराचे उत्पन्न वाढेल. या दृष्टीने आगारामार्फत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. दरम्यान या मागणीला डेपो व्यवस्थापक काव्या पेडणेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देताना आपण आपले निवेदन विभाग नियंत्रक यांच्याकडे पाठवून देईन. तसेच लवकरात लवकर बस सेवा सुरू केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.
सदर निवेदन सादर करताना विनय लिमये, महेश सप्रे, श्री आपटे, सुनील सरदेसाई ,प्रकाश पाध्ये, सुरेश पाध्ये, श्री घाटे गुरुजी, प्रसाद कुलकर्णी, सौ तीर्था कुलकर्णी उपस्थित होते











