राजापूर | प्रतिनिधी : राज्य शासनाच्या राज्यातील स्वच्छता मोहीम अभियानाच्या अंतर्गत राजापूर नगर परिषदेच्या वतीने शनिवारी राजापूर शहरात विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेच्या सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी या अभियानात सहभाग घेत शहरातील १८ मंदिरांसह सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे सार्बजनिक आरोग्य सुधारेल, पर्यावरणाचे रक्षण होईल, नागरी भागामध्ये वाढत्या प्रदुषणाला आळा बसेल हा शासनाचा हेतु आहे.या धर्तीवर राजापूर शहरात शनिवारी सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तर स्वच्छ तीर्थ अभियानांतर्गत राजापूर शहरातील विविध भागात असणाऱ्या १८ मंदिरांच्या ठिकाणी जाऊन या मंदिरांची व आजुबाजुच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी स्थानिक नागरिकही सहभागी झाले होते.
त्यांनंतर राजापूर शहरातील जवाहर चौक, शहर बाजारपेठ, तालीमखान, एसटीडेपो परिसर, मच्छीमार्केट परिसर या सार्वजनिक परिसरांचीही स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत माजी नगराध्यक्ष अॅड. जमिर खलिफे यांसह त्या त्या भागातील माजी लोकप्रतिनिधींनीही सहभाग घेतला. यावेळी स्वच्छतेची शपथही घेण्यात आली.
या प्रसंगी मुख्याधिकारी प्रशांत भोसले, मुख्य लिपीक जितेंद्र जाधव, बांधकाम अभियंता संजीव जाधव, करअधिकारी अविनाश नाईक, आरोग्य विभागाचे अधिकारी प्रसाद महाडीक आदींसह नगरप परिषदेच्या बांधकाम, आरोग्य व अन्य विभागाचे कर्मचारी व नागरिक सहभागी झाले होते.












