राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेत उपविजेता ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा संघावर अन्याय

तृतीय क्रमांकाच्या कोल्हापूर संघाला दिले उपविजेतेपद

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भेटून न्याय मिळवून देणार : संजू परब

रस्सीखेच असोसिएशनचा तीव्र शब्दांत व्यक्त केला निषेध

सावंतवाडी । प्रतिनिधी :

बुलढाणा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय टग ऑफ वॉर रस्सीखेच स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त करूनही बक्षीस वितरण प्रसंगी चक्क या संघाला डावलून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कोल्हापूर संघाला उपविजेता जाहीर करण्यात आले. असोसिएशनकडून याबाबत कोणतेही कारण न देत सिंधुदुर्ग जिल्हा संघावर अन्याय केल्यामुळे नाराज झालेल्या जिल्हा संघाने सोमवारी भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांची भेट घेत आपली व्यथा मांडली. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन जिल्हा संघाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन संजू परब यांनी दिले. संजू परब यांनी उपविजेत्या सिंधुदुर्ग जिल्हा संघाला पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले तसेच राज्य असोसिएशनच्या या कारभाराबाबत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

बुलढाणा जिल्हा टग ऑफ वॉर असोसिएशन आणि श्रीमती सिंधुताई जाधव महाविद्यालय मेहकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २३ वी राज्यस्तरीय सिनियर टग ऑफ वॉर अजिंक्यपद स्पर्धा १४ ते १६ ऑक्टोबर मेहकर जिल्हा बुलढाणा येथे पार

पडली. सदर स्पर्धेत सिंधुदुर्ग संघाने ६०० किलो ग्रॅम वजनी गटात उत्कृष्ट प्रदर्शन करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यात बलाढ्य मुंबई संघाला टक्कर देत हा संघ उपविजेता ठरला.

मात्र, सिंधुदुर्ग संघ रौप्य पदकाचा मानकरी असूनही बक्षिसं वितरणाच्यावेळी चक्क

सदर संघावर अन्याय करत त्यांना त्यांच्या हक्काच्या बक्षिसापासून कोणतेही योग्य

कारण न देता डावलण्यात आलं.

अशा बोगस कारभार चालवणाऱ्या राज्य टग ऑफ वॉर संघटनेचा जाहीर निषेध म्हणून सिंधुदुर्ग टिमतर्फे महाराष्ट्र राज्य टग ऑफ वॉर असोशीएशनकडे विचारण्यास गेले

असता त्यांनी तेथून काढता पाय

घेतला. यावेळी खेळाडूंनी याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा असोसिएशनला माहिती दिल्यानंतर जिल्हा असोसिएशनने विचारणा केली असता सदर खेळाडूंनी गैरवर्तन केल्याचे कारण पुढे केले गेले. मात्र, संपूर्ण स्पर्धेत व अंतिम सामन्यातही सिंधुदुर्ग जिल्हा संघाने कोणतेही गैरवर्तन केले नव्हते. बक्षीस डावलण्यात आल्यानंतर खेळाडूंनी याबाबत असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडे केवळ विचारणा केली होती. मात्र, याबाबत कोणतेही संयुक्तिक कारण असोसिएशनचे पदाधिकारी देऊ शकले नव्हते.

या पार्श्वभूमीवर सोमवारी संध्याकाळी जिल्ह्यात परतलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा रस्सीखेच संघाने मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर व निरवडेचे माजी सरपंच प्रमोद गावडे यांच्या सोबत भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांची भेट घेत आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबतची माहिती दिली. यावेळी संजू परब यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा संघाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी संघाचे खेळाडू तातो बांदिवडेकर, विदुल पावणोजी, वैभव सोन्सुरकर, ओमकार सोन्सुरकर, अमोल पारधी, सुमित नाईक, प्रशांत दळवी, रामा जाधव, आत्माराम पार्सेकर व सिद्धेश आजगांवकर आदी उपस्थित होते.

 

फोटो – बुलढाणा येथील राज्यस्तरीय स्पर्धेत उपविजेता ठरलेल्या सिंधुदुर्ग रस्सीखेच संघाचे अभिनंदन करताना माजी नगराध्यक्ष संजू परब सोबत मळगांव उपसरपंच हनुमंत पेडणेकर

Sindhudurg