खाजगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतल्याचे सांगत केली जाते अर्वाच्य शब्दात शिवीगाळ

विशेषतः महिला वर्गाला केले जातेय टार्गेट, महिलावर्ग हैराण

लांजा (प्रतिनिधी ) तुमच्या पत्नीने किंवा वाडीतील एका व्यक्तीने खाजगी फायनान्स कंपनीकडून तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले असून त्या कर्जाची भरणा करा असे सांगत त्यानंतर अर्वाच्य शब्दात शिवीगाळ केली जात आहे. विशेषतः महिलावर कॉल करून त्यांना टार्गेट केले जात आहे. काॅल करणारी महिला असून हा प्रकार गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे .यामुळे कोत्रेवाडी येथील ग्रामस्थ आणि विशेषतः महिला वर्ग हैराण झाला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून असा प्रकार सुरू आहे. कोत्रेवाडीतील एखाद्या महिला किंवा व्यक्तीला फेक अकाउंट वरून कॉल केला जातो. फोन करणारी व्यक्ती ही महिला असून ती मी खाजगी फायनान्स कंपनी मधून बोलत आहे असे सांगते. पुरुष असल्यास तुमच्या पत्नीने दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे असे सांगते. तर काही जणांना वाडीतील एखाद्या व्यक्तीचे नाव सांगत त्याने तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे असे सांगितले जाते.तसेच रिफरन्स साठी तुमचा नंबर दिला आहे असे सांगितले जाते.

कर्जाची भरणा करा असे सांगितले जाते.समोरील व्यक्तीकडून विचारणा केल्यास त्याला अर्वाच्य शब्दात शिवीगाळ केली जाते. फोन करणारी व्यक्ती ही महिलाच असून महिलांना टार्गेट केले जाते आणि त्यांच्यावर फेक कर्ज भरण्यासाठी दबाव आणला जातो.

मात्र प्रत्यक्षात अशा प्रकारे कोणतेही कर्ज घेतलेले नसताना या फेक कॉलमुळे महिलावर्ग हैराण झाला आहे . मानसिक मनस्ताप सहन करावा लागत आहे. पहिला येणारा कॉल जर ब्लॉक केला तर पुन्हा दुसऱ्या नवीन नंबर वरून कॉल केला जात आहे. यामुळे काही ग्रामस्थांनी लांजा पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकारची तक्रार केली आहे.