रत्नागिरी : भाजपाचे लोकसभा प्रमुख व गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे दापोलीचा दौरा केल्यानंतर ते उमेदवारांच्या यादीसाठी दिल्लीत रवाना झाले. तेव्हा माझ्या काही मित्रांचा गैरसमज झाला की बहुतेक रत्नागिरी मतदारसंघांमध्ये डॉ. सावंत येत नाहीत. परंतु अजून भारतीय जनता पार्टी म्हणजे काय, ते काय करतात हे काहींना माहिती नाहीये. आमची मूल्यांची पार्टी आहे. राष्ट्र प्रथम या उक्तीनुसार आम्ही काम करतो. सत्तेचे पद मिळावे, लाभ मिळावा याकरिता कार्यकर्ता काम करत नाही. ही जागा भाजपाच कमळाच्या निशाणीवर लढवणार आहे, असे प्रतिपादन लोकसभा सहप्रभारी बाळ माने यांनी केले.
सावरकर नाट्यगृहात आयोजित कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते. बाळ माने म्हणाले की, १९७७ मध्ये खासदार म्हणून या जनतेने अॅड. बापूसाहेब परुळेकर यांना विजयी केलं होतं. जनसंघाच्या माध्यमातून गुहागरचे आमदार डॉ. तात्यासाहेब नातू विजयी झाले. रत्नागिरीच्या पहिल्या महिला आमदार कुसुमताई अभ्यंकर यांच्या माध्यमातून भाजपाने नारींचा सन्मान केला आहे. या सर्वांचा राजकीय वारसदार म्हणून जनतेने मला निवडून दिलं होतं. परंतु २००९ आणि १४ मध्येही फसवणूक करून पाडले. आम्ही आजवर सतत संघर्ष केला. परंतु हे देवदुर्लभ असणारे कार्यकर्ते, बुथप्रमुख, सुपर वॉरियर्स हे कुठल्याही योनजेचे लाभार्थी नाहीत. परंतु ते आपल्यासोबत आहेत.
रिफायनरी व्हायला हवी- प्रमोद जठार
लोकसभा संयोजक प्रमोद जठार यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर तोंडसुख घेतलं. ते म्हणाले की, आमचा हक्काचा खासदार नसल्याने आमच्या दोन हजार गावातल्या सगळ्या मंडळींना न्याय मिळू शकला नाही. त्यामुळे आता आम्हाला कमळाचा खासदार पाहिजे. विद्यमान खासदारांनी एकही उद्योग आणला नाही. त्यामुळे तरुण बाहेर नोकरीसाठी जात आहेत. तीन लाख कोटी रुपयांची रिफायनरी व्हायला हवी. मुंबईनंतर दुसरी आर्थिक राजधानी होण्याची ताकद या प्रकल्पात आहे. परंतु विद्यमान खासदार कोकणच्या फायद्याची भूमिका घेत नाहीयेत.
भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत म्हणाले की, गेल्या खासदार, पाच आमदार निवडून देऊन आम्हा कार्यकर्त्यांना काही मिळाले नाही. त्यामुळे लोकसभेची जागा भाजपाच लढवणार आहे. आमच्या हक्काचा खासदार आम्हाला हवा आहे. पंतप्रधान मोदींनी आम्हाला दहा वर्षे भरपूर काही दिले. आता आम्ही आमचा हक्काचा भाजपचा खासदार मोदींना देणार आहोत. डॉ. सावंत यांनी पर्यटनाच्या माध्यमातून गोवा सुजलाम, सुफलाम केला त्याप्रमाणे आमचा भागही सुफलाम करण्यासाठी वरिष्ठांना तिकीट देण्यास सांगावे.












