राजापूर (वार्ताहर): महिला सह. पतसंस्थेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्याबरोबरच सहकार क्षेत्रात महिला पतसंस्थेला नावारूपाला आणण्यासाठी धडपडणाऱ्या येथील राजापूर महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. सुनिता राजेंद्रकुमार व्हनमाने व ज्येष्ठ संचालिका व माजी अध्यक्षा सौ. शिल्पा धनंजय मराठे यांचा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून गौरविण्यात आले.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने जागतिक महिला दिनी राज्यांतील विविध पतसंस्थांमध्ये काम करत असलेल्या महिलांना सन्मानित केले जाते. त्या आपल्या कार्यक्षेत्रात करत असलेल्या कामाचे कौतुक आणि त्यांना या कामासाठी प्रेरीत करण्याच्या उद्देशाने दरवर्षी हा उपक्रम फेडरेशनच्या वतीने राबविण्यात येतो.
पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या या कार्यक्रमात सौ. व्हनमाने यांना अरूणा वळसेपाटील यांच्या हस्ते तर सौ. मराठे यांना सौ. गौरी बेनके यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याबद्दल सौ. व्हनमाने व सौ. मराठे यांच्या संचालक मंडळ व कर्मचारी वृंद व सभासदांतर्फे अभिनंदन करण्यात आले.










