खेड मध्ये जलवाहिनी दुरूस्तीसाठी खोदाईचे सत्र सुरूच

खोदाईनंतरच्या मलमपट्टीमुळे रस्त्यांची दुरवस्था, ठोस उपाययोजनांची मागणी
खेड(प्रतिनिधी) खेड नगरपरिषद हद्दीतील जुन्या जलवाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण होवून पाणीपुरवठ्यात येणाऱ्या व्यत्ययामुळे दुरुस्तीसाठी जलवाहिन्यांची खोदाई करावी लागत आहे. खोदाईनंतर भाग परिपूर्णरित्या न बुजवता मलमपट्टी केली जात असल्याने रस्ते उखडत आहेत. जलवाहिन्यांच्या दुरूस्तीसाठी खोदाईचे सत्र अद्याप सुरूच असल्याने रस्त्यांची दैनावस्था होत आहे.
शहरातील जुनाट जलवाहिन्या बदलण्याची तसदी नगरप्रशासनाने अद्यापही घेतलेली नाही. याचमुळे जलवाहिन्यांमध्ये सातत्याने बिघाड होत आहेत. पाणीपुरवठ्यात येणाऱ्या व्यत्ययामुळे नागरिकांचा मनस्ताप कायम आहे. या जलवाहिन्यांच्या दुरूस्तीकरिता मुख्य मार्गावरच खोदाई करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील उभा ठाकत आहे. तसेच खोदाई केल्यानंतर त्यावर केवळ माती टाकून बुजवण्याच्या प्रकारामुळे रस्त्याची दुरावस्था होत आहे.
खोदलेल्या ठिकाणी खडीसह डांबरीकरण करण्याची तसदी घेतली जात नसल्याने वाहतुकीसही अडथळा निर्माण होत आहे. खोदलेली माती पसरत असल्याने धुळीचे साम्राज्य निर्माण होत आहे. गुरुवारीही महाडनाका येथे मध्यभागी जलवाहिनी दुरुस्तीसाठी खोदाई करण्यात आली. यामुळे खेड- भरणे मार्गावर एकेरी वाहतुकीचा अवलंब करावा लागला. नगरप्रशासनाने ही नादुरूस्त जलवाहिनीवर ठोस उपाययोजनांचा अवलंब करण्याची मागणी होत आहे.