अजूनही टँकरची प्रतीक्षाच; ग्रामस्थ शासन दरबारी घालताहेत खेटे
खेड(प्रतिनिधी) तालुक्यात रणरणत्या उन्हाने कहर केलेला असतानाच दिवसागणिक टंचाईग्रस्त गाव- वाड्यांची संख्याही वाढत आहे. येथील पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे ५ गावातील १३ वाड्यांतील ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी अर्ज दाखल केलेला असतानाही अजूनही त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरूवातच झालेली नाही. यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना अक्षरश: वणवण करावी लागत आहे
तालुक्यात शिमगोत्सवाची धामधूम सुरू असल्याने मोठ्या संख्येने चाकरमानी गावी डेरेदाखल झाले आहेत. मात्र, उपलब्ध जलस्रोत आटत चालल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी दाहीदिशाच सुरू आहे. काही चाकरमान्यांनी ग्रामदेवतांच्या पालख्यांचे दर्शन
घेत मुंबई गाठणे पसंत केले. पाणीटंचाईने
हैराण झालेले ग्रामस्थ टँकरच्या पाण्यासाठी शासन दरबारी सातत्याने खेटे घालत आहेत. मात्र, तरीदेखील अजूनही टँकरने पाणीपुरवठा करण्याची तसदी प्रशासनाने न घेतल्याने ग्रामस्थ अक्षरशः हतबलच झाले आहेत.
तालुक्यातील खोपी-अवकिरेवाडी, मानेवाडी येथील ग्रामस्थांचा टँकरच्या पाण्यासाठी पहिला अर्ज दाखल झाला होता. यामुळे येथे तालुक्यातील पहिला टँकर धावण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्या पाठोपाठ लगोलगच सुसेरी-देवसडे येथील सावंतवाडी, वैरागवाडी, जाधववाडी, बौद्धवाडी, मधलीवाडी,
कुळवंडी-शिंदेवाडी, कशेडीतील वाड्यांतील ग्रामस्थांनीही टँकरच्या पाण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. सर्वेक्षणानंतर दाखले प्राप्त होताच टँकरने पाणीपुरवठा करण्याचे संकेत देण्यात आले होते. मात्र, १५ हून अधिक दिवसांचा कालावधी लोटूनही अद्यापही तहानलेल्या ग्रामस्थांना टँकरच्या पाण्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे. उपलब्ध जलस्रोत पुरते आटल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करून मिळणाऱ्या जेमतेम पाण्यावर तहान शमवावी लागत आहे.
प्रशासन टँकरने पाणीपुरवठा करणार तरी कधी, असा उद्विग्न सवालही तहानलेले ग्रामस्थ करत आहेत. रणरणत्या उन्हामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले असून टंचाईग्रस्त गाव-वाड्यांच्या संख्येत आणखी भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.












