कोमसापचे उद्यापासून मालगुंडला जिल्हा संमेलन

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा मराठी साहित्य संमेलन ६ आणि ७ एप्रिलला मालगुंडच्या कवी केशवसुत स्मारकात आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनुपमा उजगरे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन होणार असून, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, अशी माहिती केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर व संमेलन संयोजन समितीचे प्रमुख रमेश कीर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

संमेलनात शनिवारी सकाळी ८.३० वा. माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी काढण्यात येईल. १० वा. उद्घाटन कार्यक्रमाला संस्थापक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक, स्वागताध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक रवींद्र तथा अण्णा सामंत, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, साहित्यिक सुरेश जोशी, मालगुंड सरपंच श्वेता खेऊर, मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील मयेकर आदी उपस्थित राहणार आहेत.

 

दुपारी १२.३० ते २ या वेळेत पुस्तकं… सांगतात खूप काही या परिसंवादात प्रा. बाळासाहेब लबडे, जयू भाटकर, मदन हजेरी, जयश्री बर्वे संवाद साधतील. अध्यक्षस्थान साहित्यिक प्रा. सुरेश जोशी भूषवतील. दुपारी ३ वा. कविता पद्य पदन्यासमध्ये अमेय धोपटकर व सहकारी सादरीकरण करतील. सायंकाळी ४.३० वा. युवक आणि समाजमाध्यमांवरील लेख या विषयावरील परिसंवादात माधव अंकलगे, अरूण मोर्ये, राजेश गोसावी, शाहिद खेरटकर, युयुत्सू आर्ते संवाद साधतील. अध्यक्षस्थानी गोविंद राठोड आहेत. सायं. ६.३० ते ८ या वेळेत नैऋत्येकडील वारा या कवीसंमेलनात प्रा. एल. बी. पाटील, सुधीर शेठ, प्रवीण दवणे, रूजारियो पिंटो, उषा परब, लता गुठे, आकांक्षा भुर्के व गझलकार देविदास पाटील व सहकारी सहभागी होतील. याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर भूषवणार असून, अरूण म्हात्रे संवादक आहेत. रात्री ८ वा. स्नेहभोजनानंतर ९ वा. कोकणातील लोककलांचा सांस्कृतिक कार्यक्रम स्थानिक कलाकार सादर करणार आहेत. यात कोळीनृत्य, जाखडी, मंगळागौर, नमन, समई नृत्य, पोवाडा व इतर कार्यक्रम आहेत.

 

७ एप्रिलला सकाळी ९ वा. बदलते कोकण परिसंवादात पर्यटन व उद्योगावर रमेश कीर, सांस्कृतिकवर नितीन जोशी, शैक्षणिकबाबत डाएटचे प्राचार्य सुशील शिवलकर, पत्रकारितेवर पत्रकार सतीश कामत संवाद साधतील. प्रमोद कोनकर याचे संवादक आहेत. सकाळी ११.१५ ते १ या वेळेत कवितेच्या गावा जावे कार्यक्रमात ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, अरूण म्हात्रे, एल. बी. पाटील, अनुपमा उजगरे कविता सादर सादर करतील. बालसाहित्याच्या प्रांगणात हा दुपारी १ ते २ विशेष कार्यक्रम भारत शिक्षण मंडळाचे कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरचे विद्यार्थी कथा, कविता, नाट्यछटा, गाणी, एकांकिका असे विविधांगी सादरीकरण करणार आहेत. दुपारी ३ वा. कवी संमेलन होणार असून, यात प्रमुख अमेय धोपटकर व अरूण मौर्ये असून, उज्ज्वला बापट, शुभदा मुळ्ये व जिल्ह्यातील इतर शाखांमधील कवी सादरीकरण करतील. संमेलनाचे समारोप ४.३० वा. होईल.