नांदगाव | वार्ताहर : कोळोशी -असलदे ग्रुप ग्रामपंचायतचे पहिले सरपंच तथा सरस्वती हायस्कूल नांदगावचे उपाध्यक्ष,असलदे डामरेवाडी येथील थोर सामाजिक कार्यकर्ते अंकूश डामरे(९२) यांचे नुकतेच मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले.उद्योजक सुरेश डामरे यांचे ते वडील होते.त्यांच्या निधनाने दशक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.एक मोठ्या मनाचा, दिलदार स्वभावाचा व कामावर निष्ठा असलेला प्रामाणिक तसेच शिस्तप्रिय आणि अनेक पदे यशस्वीपणे पार पाडणारे कार्यकर्ते हरपले अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
कोळोशी असलदे ग्रुप ग्रामपंचायतचे पहिले सरपंच तथा गेली कित्येक वर्षे सरस्वती हायस्कूल नांदगावचे संचालक, विद्यमान उपाध्यक्ष असलदे डामरेवाडी स्थानिक कमिटीचे अध्यक्ष याशिवाय विविध पदे भुषविताना निस्वार्थीपणे काम करत सर्वांना सोबत घेऊन सामाजिक कामं कशी करायची याच अंकूश डामरे म्हणजे चालत फिरत उदाहरण.त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली.असा प्रमाणिक आणि स्वावलंबी माणूस पुन्हा होणे कठीण.त्यांनी त्यांच्या कामाचा स्वकर्तृत्वावर वेगळा ठसा उमटवला.परिसरात मोठा मित्रपरिवार होता.समाजात अंकुश डामरे म्हणजे एक आदराची व्यक्ती होती.कुठलेही काम हाती घेतल्यानंतर निर्विघ्नपणे पार पाडणारे अंकूश डामरे दशक्रोशीत सर्वांच्या कायम स्मरणात राहतील.त्यांनी केलेली कामे,जोडलेली माणसे, कित्येक जनांचे मोडणारे संसार उभा करणारा माणूस आज आपल्यातून निघून गेला याची सर्वांना खंत राहील. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.












