36 माध्यमिक शाळांचा निकाल 100 टक्के
राजापूर (वार्ताहर): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाईन पध्दतीने जाहीर झाला आहे. यामध्ये राजापूर तालुक्याने आपल्या धवल यशाची परंपरा कायम राखली आहे. दहावी परिक्षेचा राजापूर तालुक्याचा एकुण निकाल 98.48 टक्के लागला आहे.
या परिक्षेसाठी राजापूर तालुक्यातील 51 माध्यमिक शाळांमधुन 1654 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. पैकी 1629 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 36 माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे.
या परिक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या 406 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी, 712 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, 436 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तर 75 विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
दहावी परिक्षेत सुयश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षक, पालक, संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.











