कशेडी बोगदा मार्गावर एस. टी. बसमुळे वाहतूक कोंडी

 

खेड (प्रतिनिधी) मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात अवजड वाहतूक व एसटी बसेस यांना बंदी घातले असतानाही ३ रोजी पोलादपूर बाजूकडून खेड दिशेने जाण्यासाठी एस.टी. चालकाने बस कशेडी बोगदामार्गे नेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे बोगद्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली, अशी माहिती या मार्गावर उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली.

कशेडी बोगदा अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला असला तरी अनेक चालक आपली वाहन कशेडी बोगदा मार्गे मार्गस्थ करत असल्याचे वास्तव ३
रोजी दुपारी पुन्हा एकदा दिसून आले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चालकाने एसटी बस बोगद्यातून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र ठिकठिकाणी उभारलेल्या अडथळे व लहान वाहनांची संख्या अधिक असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. बोगद्यातून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे हे माहिती असूनसुद्धा एस.टी. चालकाने बस या मार्गवर घातली.

शिवसेना नेते कदम यांनी घेतली गंभीर दखल

कशेडी बोगद्यातून वाहतूक कोंडी झाली तेव्हा नेमके शिवसेना नेते माजी मंत्री रामदास कदम हे खेड बाजूकडून मुंबईकडे जात होते. वाहतूक कोंडी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. एसटी बस चालकाने या मार्गावर बस आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचे समजताच कदम यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. याबाबत त्यांनी गंभीर दखल घेत संबंधित यंत्रणेला सूचना केल्या.