वेरवली बेर्डेवाडी धबधबा दुर्घटनेनंतर प्रशासन अलर्ट मोडवर

 

 

वेरवली धरण धबधबा आणि खोरनिनको धबधबा या ठिकाणी १४४ कलम लागू 

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील वेरवली बेर्डेवाडी धबधब्यावरील दुर्घटनेनंतर प्रशासन अलर्ट मोडवर आले असून खबरदारीचा उपाय म्हणून वेरवली धरण धबधबा आणि खोरनिननको धबधबा या ठिकाणी १९ जुनं पासून १४४ कलम लागू करण्यात आले आहे. तर शनिवार, रविवारी याठिकाणी पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.

तालुक्यातील वेरवली बेर्डेवाडी येथील धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या राजापूर तालुक्यातील कळसवली येथील २६ वर्षीय तरुणाचा रविवारी पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.यानंतर या ठिकाणच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. या धरण प्रकल्प आणि धबधब्याकडे जाणाऱ्या पर्यटकांना यापूर्वीच मज्जाव करण्यात आलेला आहे. प्रकल्पाकडे जाणारा रस्ता देखील बंद करण्यात आला आहे. धरणाकडे जाणारे दोन्ही गेट बंद करण्यात आली असून त्या ठिकाणी धरण प्रकल्पाकडे जाणाऱ्या पर्यटकांना बंदी घालण्याच्या सूचनावजा फलक ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत. आणि याचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल सूचना फलक देखील या ठिकाणी जागोजागी लावण्यात आलेले आहेत. मात्र तरी देखील पर्यटक आदेश धाब्यावर बसवून त्या ठिकाणी जातात.

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलीस आणि पाटबंधारे विभाग सतर्क झाल आहे. तर बुधवारी १९ जून रोजी लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांनी लांजा पोलिसांनी दिलेल्या प्रस्तावानुसार बेर्डेवाडी धरण आणि खोरेनिनको मुचकुंदी धरण धबधबा या परिसरात १४४ कलम लागू करुन मनाई करण्याचे आदेश जारी केले आहेत. मुंबई पोलीस अधिनियमानुसार जमावबंदी या धरण परिसरात करण्यात आली आहे. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची आदेश दिले आहेत.

तर शनिवार, रविवारी वरील दोन्ही ठिकाणी पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.