पदवीधर निवडणुकीत श्री. डावखरे यांच्या मनसे पाठीशी
वैभववाडी l प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांनी कोकण पदवीधर मतदार संघाचे उमेदवार निरंजन डावखरे यांची कणकवली येथे भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या विजयात मनसेने खारीचा वाटा उचलला आहे. त्याचप्रमाणे पदवीधरचे उमेदवार निरंजन डावखरे यांना देखील प्रत्येक तालुक्यातून मोठे मताधिक्य देणार असे यावेळी मनसे कणकवली विधानसभा सचिव सचिन तावडे यांनी सांगितले. यावेळी कणकवली तालुका अध्यक्ष शांताराम सादये, वैभववाडी तालुकाध्यक्ष महेश कदम, कणकवली उपशहर अध्यक्ष शरद सावंत आदी उपस्थित होते.
मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीचे कोकण पदवीधर मतदार संघाचे उमेदवार श्री निरंजन डावखरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने माननीय नेते श्री शिरीष सावंत सरचिटणीस श्री संदीप दळवी, कामगार सेना सरचिटणीस श्री गजानन राणे, संपर्क अध्यक्ष श्री संतोष शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे पदाधिकारी यांनी श्री डावखरे यांची भेट घेतली.
यावेळी पदवीधर मतदारांच्या विविध समस्येवर चर्चा करण्यात आली. भविष्यात त्यांच्या सर्व समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन श्री डावखरे यांनी मनसे पदाधिकारी यांना दिले. भविष्यात राबविण्यात येणारे विकासाचे व्हिजन, शैक्षणिक योजना यावर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कणकवली विधानसभा मतदारसंघातर्फे विधानसभा सचिव श्री सचिन तावडे यांनी डावखरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. लोकसभेच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे मनसेने खारीचा वाटा उचलला. तसेच पदवीधर निवडणुकीत प्रचार करून मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आश्वासन श्री तावडे व कदम यांनी दिले.











