चिपळूण (प्रतिनिधी) : लवेल येथील घरडा इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथे दिनांक १ जुलै ते ३ जुलै या कालावधीमध्ये अध्यापक कौशल्यविकास कार्यशाळा संपन्न झाली. “जागतिक मानवी मूल्ये” या विषयावर आधारित असणाऱ्या या कार्यशाळेमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला संलग्न अशा समग्र मूल्याधिष्ठित शिक्षण या विषयाला अनुसरून विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. घरडा इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी आणि ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (ए.आय.सी.टी.ई) यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील ८९ अध्यापक सहभागी झाले होते.
राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणाबरोबरच मानवी मूल्ये रुजवणे हे समाजाच्या विकासासाठी उपयुक्त आहे. आजचा विद्यार्थी पुढे जाऊन राष्ट्र निर्माण करणार आहे आणि तोच समाजाला दिशा देणार आहे. आणि त्यासाठी राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी उत्तम विद्यार्थी निर्माण करणे हे प्रत्येक अध्यापकाचे कर्तव्य असते. यासाठी अध्यापकांमध्ये जीवनविषयक समग्र भाव निर्माण करणे, समाजभान आणि पर्यावरणाविषयी जबाबदारी अंगीकृत करणे, अध्यापकांमध्ये नैतिक मूल्ये तसेच आरोग्य आणि स्वच्छ्ता यांविषयी जागरूकता निर्माण करणे, उत्कृष्टतेची आकांक्षा आणि सर्व घटकांप्रती कृतज्ञताभाव निर्माण करणे ही या कार्यशाळेची प्रमुख उद्दिष्टे होती. तीन दिवस आयोजित या कार्यशाळेमध्ये ए.आय.सी.टी.ई. नियुक्त तज्ञ प्राध्यापक डॉ. महेश कोलते आणि डॉ. हणमंत नयने या वक्त्यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यशाळेमध्ये आनंद आणि समृद्धी म्हणजे नक्की काय आणि ते प्राप्त करण्यासाठी कोणती मानवी मूल्ये जोपासली पाहिजेत, मानवाचे शरीर आणि मन यांचे नाते, समाजातील मान्यता आणि संवेदना यांविषयी साधक बाधक चर्चा झाली. समृद्धतेकडे जाण्यासाठी प्रत्येक गोष्टीचे आस्वादन, चयन, तुलना आणि विश्लेषण कसे केले पाहिजे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. मानवाचा समग्र विकास आणि त्यामधील शिक्षणाची भूमिका, स्वतःचा शोध घेण्याच्या प्रक्रियेतील आनंद आणि समृद्धी, आत्मज्ञान आणि समाजामधील सुसंवाद, समृद्ध कुटुंब आणि समाजाचे आरोग्य, नात्यांमधील आदर,विश्वास आणि सुसंवाद, मानवाचे भावविश्व, पर्यावरणातील महत्त्वाचे घटक आणि त्यांच्यातील सुसंवाद अश्या अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर या कार्यशाळेमध्ये चर्चा झाली. याचबरोबर दररोज दिवसाच्या अखेरीस सहभागी अध्यापकांची सामूहिक कृती आणि चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेचा समारोप स्वमूल्यांकन सत्राने झाला. यामध्ये प्रत्येक सहभागी अध्यापकाने स्वतःचे मूल्यांकन करून या तीन दिवसामध्ये काय शिकलो याबद्दल स्वानुभव कथन केले.
कार्यशाळेच्या आयोजनामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, उपप्राचार्य डॉ.सचिन पाटील, विश्वस्त प्रतिनिधी डॉ.अनंत मराठे, संस्थेचे धोरण आणि विकास प्रमुख श्री. रत्नेश सिन्हा यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी कार्यशाळेचे समन्वयक प्रा.डॉ.कोळेकर आणि उपसमन्वयक प्रा. होवाळ यांनी मेहनत घेतली.











